पणजी बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी

गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारी पणजी शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी-पालकांची लगबग, तसेच सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या चाकरमान्यांची वाढलेली संख्या यामुळे पणजीतील कदंबा बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 mins ago
पणजी बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी

पणजी : गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारी पणजी शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी-पालकांची लगबग, तसेच सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या चाकरमान्यांची वाढलेली संख्या यामुळे पणजीतील कदंबा बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली. 

सकाळी  कार्यालयीन वेळेत बसस्थानकाकडे येणाऱ्या आणि तेथून विविध भागांत जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली. बस, खासगी वाहने, दुचाकी आणि रिक्षांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे वाहतूक संथ झाली. काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना तसेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.

गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण कुटुंबासह गावी गेले होते. सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा पणजी व परिसरातील कामाच्या ठिकाणी परतल्याने शहरातील नेहमीची सकाळची गर्दी आणखी वाढली. त्यातच शाळा सुरू झाल्याने शालेय बस आणि पालकांच्या वाहनांचीही भर पडली.

कदंबा बसस्थानक परिसर हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याने गर्दीच्या वेळी येथे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी गर्दीच्या वेळेत वाहतुकीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा