मोरजीत हॉटेल-रिसॉर्टचे सांडपाणी थेट ओहोळातून समुद्रात

किनारी भागातील नागरिक संतप्त; आरोग्य खात्यासह पंचायतीकडे कठोर कारवाईची मागणी : मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भागात काही हॉटेल, रिसॉर्ट आणि गेस्ट हाऊसमधील सांडपाणी पाइपद्वारे थेट ओहोळात तसेच समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण होण्याबरोबरच भविष्यात नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराची तातडीने पाहणी करून दोषी आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
मोरजीत हॉटेल-रिसॉर्टचे सांडपाणी थेट ओहोळातून समुद्रात

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भागात काही हॉटेल, रिसॉर्ट आणि गेस्ट हाऊसमधील सांडपाणी  पाइपद्वारे थेट ओहोळात तसेच समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रदूषण होण्याबरोबरच भविष्यात नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराची तातडीने पाहणी करून दोषी आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोरजी समुद्रकिनारी भागात पर्यटन व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक लहान-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊसेस कार्यरत आहेत. पर्यटन हंगामात हंगामी स्वरूपाची, तसेच काही ठिकाणी कायमस्वरूपी बांधकामेही उभी राहत आहेत. विविध आस्थापनांमध्ये दहा, वीस, पन्नास ते शंभरपर्यंत खोल्या उपलब्ध आहेत. पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक या परिसरात वास्तव्य करतात.मात्र, काही आस्थापनांच्या मालकांनी निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा किंवा सुरक्षित निचरा व्यवस्था उभारण्याऐवजी काही व्यावसायिकांकडून सांडपाणी पाइपद्वारे थेट ओहोळात सोडले जाते; ते पुढे समुद्रात मिसळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उघड्यावर तसेच ओहोळात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढणे, भूजल व समुद्राचे पाणी दूषित होणे आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

याचा स्थानिक रहिवासी, पर्यटक, मच्छीमार आणि समुद्रकिनाऱ्याच्या पर्यावरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोरजी पंचायत, आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित सरकारी विभागांनी संयुक्त पाहणी करून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन करून सांडपाणी उघड्यावर, ओहोळात किंवा समुद्रात सोडणाऱ्या आस्थापनांना नोटिसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. प्रशासनाने संभाव्य आरोग्यसंकटाची वाट न पाहता तातडीने हस्तक्षेप करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.