जिनेव्हा : पृथ्वीवरील जलचक्र दिवसेंदिवस अधिक अनिश्चित होत आहे. काही भागांत तीव्र दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (WMO) दिला आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपेक्षित असलेल्या तीव्र ‘एल निनो’मुळे काही प्रदेशांमध्ये दुष्काळ, तर काही भागांत पुराचा धोका वाढू शकतो.
डब्ल्यूएमओच्या (WMO) ‘स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्सेस’ या वार्षिक अहवालानुसार, २०२५ हे गेल्या ३५ वर्षांतील जगातील नद्यांसाठी सर्वाधिक कोरड्या वर्षांपैकी एक ठरले. सलग सातव्या वर्षी जगातील बहुतांश नदी खोऱ्यांमध्ये प्रवाहाची स्थिती सामान्य नव्हती. केवळ सुमारे ३६ टक्के नदी खोऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह सामान्य होता. तितक्याच प्रमाणात नदीप्रवाह सरासरीपेक्षा कमी, तर २१ टक्के खोऱ्यांमध्ये तो सरासरीपेक्षा अधिक होता.
हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत
२०२५ हे विक्रमी उष्ण वर्षांपैकी एक ठरले. या काळात जगभरातील हिमनद्यांचे आकुंचन सुरूच राहिले. सलग चौथ्या वर्षी सर्व प्रदेशांतील हिमनद्यांनी मोठ्या प्रमाणात बर्फ गमावला. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत हिमनद्यांमधून सुमारे १,४०० गिगाटन पाणी कमी झाले. हे प्रमाण सुमारे ५६ कोटी ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावांमध्ये मावेल एवढे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भूजलाची स्थितीही चिंताजनक आहे. २०२५ मध्ये जगभरातील निरीक्षण करण्यात आलेल्या जवळपास दोन-तृतीयांश विहिरींमधील भूजल पातळी ऐतिहासिक सरासरीपेक्षा वेगळी आढळली.
‘आपण पाण्याचा राखीव साठा खर्च करत आहोत’
डब्ल्यूएमओच्या महासचिव सेलेस्ते साउलो यांनी भूजल आणि हिमनद्यांना पृथ्वीचे ‘बचत खाते’ संबोधले. दुष्काळ किंवा कोरडा हंगाम आला तरी या साठ्यांमुळे पाणीटंचाईचा तात्काळ परिणाम कमी करता येत होता. मात्र, आता हेच राखीव साठे वेगाने कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील वाऱ्यांचे आणि पर्जन्यमानाचे स्वरूप बदलू शकते. त्यामुळे काही भागांत दुष्काळाची तीव्रता वाढण्याची, तर अन्य भागांत अतिवृष्टी आणि पूर येण्याची शक्यता आहे.
‘पाण्याला सीमा नसतात’ असे सांगत साउलो यांनी देशांमध्ये जलस्रोतांशी संबंधित सामायिक माहिती, समान मानके आणि पूर्वसूचना यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. नदीचे पाणी अनेकदा दुसऱ्या देशातूनही येत असल्याने एका देशातील जलसंकटाचा परिणाम दुसऱ्या देशावरही होऊ शकतो, असा इशाराही डब्ल्यूएमओने दिला.


