‘राजा शिवाजी’ने ‘सैराट’ला टाकले मागे

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
just now
‘राजा शिवाजी’ने ‘सैराट’ला टाकले मागे

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने अभूतपूर्व कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. गेल्या १० वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर अबाधित असलेला ‘सैराट’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत बॉलिवूडच्या बड्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या महाकाव्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग केली आणि पहिल्या दोन आठवड्यांत उल्लेखनीय सातत्य राखले. यापूर्वी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सैराट’ हा १०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता, ज्याने जगभरात ११० कोटींची कमाई केली होती. गेल्या १० वर्षांत हा विक्रम कोणालाही मोडता आला नव्हता; मात्र ‘राजा शिवाजी’ने आपल्या रिलीजच्या अवघ्या सतराव्या दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडून ‘सैराट’ला मागे टाकले. सध्या या चित्रपटाने भारतात ९३.९० कोटी तर जगभरात तब्बल ११४.८० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तिसऱ्या वीकेंडलाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १५ व्या दिवशी (शुक्रवार) १.७० कोटी, १६ व्या दिवशी (शनिवार) २.९० कोटी आणि १७ व्या दिवशी (रविवार) ३.८० कोटींची कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.

हेही वाचा