प्रभास, शिवकार्तिकेयन ते कपिल शर्मापर्यंत दमदार मनोरंजन


2 hours ago
प्रभास, शिवकार्तिकेयन ते कपिल शर्मापर्यंत दमदार मनोरंजन

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी सजली आहे. प्रभासचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ ते शिवकार्तिकेयनचा ऐतिहासिक-राजकीय ड्रामा ‘पराशक्ती’, तसेच ‘द लिंकन लॉयर’चा नवा सीझन आणि कपिल शर्माची धमाल कॉमेडी चित्रपट ‘किस किस को प्यार करू २’ प्रेक्षकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.


द राजा साब । जिओहॉटस्टार
प्रभास या चित्रपटात दुहेरी भूमिकेत असून, त्याच्यासोबत संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘मारुती’ दिग्दर्शित हा हॉरर-फँटसी कॉमेडी चित्रपट राजू नावाच्या तरुणाभोवती फिरतो, ज्याला वारशाने एक रहस्यमय आणि ओसाड राजवाडा मिळतो. अलौकिक शक्ती, कुटुंबीय गुपिते आणि विनोद यांचा जबरदस्त मेळ या कथेत पाहायला मिळतो.


द लिंकन लॉयर : सीझन ४ । नेटफ्लिक्स
मॅन्युएल गार्सिया-रुल्फो पुन्हा एकदा मिकी हॅलरच्या भूमिकेत परतला आहे. मात्र यावेळी तो इतरांची नव्हे, तर स्वतःची केस लढताना दिसणार आहे. मायकेल कॉनेली यांच्या ‘द लाॅ ऑफ इनोसन्स’ या कादंबरीवर आधारित या सीझनमध्ये मिकीच्या कारच्या डिकीत मृतदेह सापडतो आणि तो स्वतः आरोपी बनतो. थरार, कोर्टरूम ड्रामा आणि सस्पेन्सचा तुफान अनुभव या सिरीजमध्ये पहायला मिळतो.


पराशक्ती । झी ५
शिवकार्तिकेयन आणि अथर्वा यांनी साकारलेल्या भावांच्या कथेतून १९६० च्या दशकातील तमिळनाडूमधील हिंदी लादणीविरोधी चळवळीचे वास्तव उलगडले जाते. सत्य घटनांवर आधारीत हा चित्रपट सांस्कृतिक ओळख, विद्यार्थी चळवळ आणि राजकीय संघर्षाची किंमत प्रभावीपणे मांडतो.


किस किसको प्यार करूँ २ । जिओ हॉटस्टार
कपिल शर्मा पुन्हा एकदा मोहन शर्माच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. चुकून तीन वेगवेगळ्या धर्मातील महिलांशी लग्न झाल्यानंतर मोहनच्या आयुष्यात निर्माण होणारा गोंधळ, त्यातच संशयी पोलीस यामुळे हास्याचा धमाका उडतो.


नारी नारी नडुमा मुरारी । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
शरवानंद अभिनीत हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट एका आर्किटेक्टभोवती फिरतो. लग्नाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या भूतकाळातील गुप्त लग्नाचा आणि एका ‘भूताचा’ खुलासा होतो. त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.


रिलेशनशिप गोल्स । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
पाद्री मायकेल टॉड यांच्या पुस्तकावर आधारित ही रोमँटिक कॉमेडी आहे. केली रोलँड एका टीव्ही प्रोड्युसरच्या भूमिकेत असून, करिअर आणि जुन्या नात्यांमध्ये अडकलेल्या आयुष्याची मजेशीर आणि भावनिक गोष्ट या चित्रपटातून उलगडते.


शबद : रीत और रिवाज । झी ५
सुविंदर विक्की आणि मिहीर आहुजा यांचा हा संवेदनशील कौटुंबिक ड्रामा आहे. पारंपरिक रागी गायक असलेले वडील आणि फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा. परंपरा आणि स्वप्नांमधील संघर्ष या चित्रपटाची मध्यवर्ती थीम आहे.


क्वीन ऑफ चेस । नेटफ्लिक्स
जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू जुडित पोल्गार यांच्या जीवनावर आधारित हा माहितीपट आहे. वयाच्या १५व्या वर्षी ग्रँडमास्टर बनलेल्या जुडित यांचा पुरुषप्रधान खेळातील संघर्ष, यश आणि वैयक्तिक आयुष्य यांचे वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळते.


सल्वाडोर । नेटफ्लिक्स
हा थरारक अ‍ॅक्शन-ड्रामा एका रुग्णवाहिका चालकाची कथा सांगतो, ज्याची मुलगी हिंसक उजव्या अतिरेकी संघटनेत सामील झाल्याचे उघड होते. तिला वाचवण्यासाठी तो त्या संघटनेत शिरकाव करतो आणि स्वतःच्या नैतिक मर्यादांना सामोरे जातो.

हेही वाचा