
या आठवड्यात प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा मोठा खजिना खुला होणार आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार, ॲपल टीव्ही आणि झी५ या प्लॅटफॉर्मवर थरार, अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि रहस्यपटांनी भरलेली नवी सामग्री प्रदर्शित होत आहे. मुख्य आकर्षणामध्ये भूमी पेडणेकरची ‘दलदल’, रणवीर सिंगचा ‘धुरंधर’यांचा समावेश आहे.

ब्रिजर्टन सीझन ४ भाग १ । नेटफ्लिक्स
या सीझनमध्ये कथा बेनेडिक्ट ब्रिजर्टनभोवती फिरते. एका गूढ युवतीशी झालेली भेट त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. राजेशाही थाट, प्रेमकथा आणि नाट्य यांचा सुंदर संगम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

धुरंधर । नेटफ्लिक्स
जागतिक बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केल्यानंतर रणवीर सिंगचा हाय-वोल्टेज स्पाय थ्रिलर ओटीटीवर दाखल होत आहे. चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांचीही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दलदल । ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
भूमी पेडणेकरची गंभीर आणि थरारक क्राईम थ्रिलर सीरिज आहे. मुंबईची नवी डीसीपी रीता फरेरा एका क्रूर सिरीयल किलरच्या जाळ्यात अडकते. ही कथा विश धामिजा यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

सर्वम माया । जिओहॉटस्टार
ही एक निविन पॉली अभिनित मल्याळम सुपरनॅचरल कॉमेडी आहे. एक नास्तिक संगीतकार आणि विस्मरण झालेली एक आत्मा यांच्यातील अनोखी मैत्री आणि भावनिक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो.

देवखेळ । झी५
हा मराठी भाषेतील रहस्यमय क्राईम थ्रिलर आहे. कोकणातील देवताली गावात दरवर्षी होळी पौर्णिमेला होणाऱ्या संशयास्पद मृत्यूंचा तपास करण्यासाठी आलेला इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे एका भयंकर रहस्याच्या मागावर लागतो.

वंडर मॅन । जिओहॉटस्टार
मार्वलची नवी सुपरहिरो मिनी-सीरिज. अभिनेता सायमन विल्यम्स सुपरपॉवर्स असूनही ते लपवून ठेवतो, कारण सुपरपॉवर्ड लोकांना फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी असते. अभिनय आणि सुपरहिरो जग यांचा भन्नाट संगम या मालिकेत पाहायला मिळेतो.

श्रिंकिंग सीझन ३ । ॲपल टीव्ही
जिमी आपल्या मुलीच्या कॉलेजला जाण्यानंतर आयुष्यातील बदलांना सामोरे जातो. पॉल पार्किन्सन आणि निवृत्तीशी झुंज देतो. या सीझनमध्ये मायकल जे. फॉक्स यांचा खास सहभाग आहे.

द रेकिंग क्रू । ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
हा जेसन मोमोआ आणि डेव्ह बटिस्टा यांचा धमाकेदार अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. दोन सावत्र भाऊ आपल्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करताना हवाईमध्ये याकुझा आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या मोठ्या कटात अडकतात.