ताज सिदादे गोवा, फुदासांव ओरिएंट इन इंडिया, कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजन

पणजी : गोव्यातील तरुण कलाकारांना प्रोत्साहन देणे, शास्त्रीय कलांना मंच उपलब्ध करून देणे यासाठी ताज सिदादे गोवा, फुदासांव ओरिएंट इन इंडिया आणि कला आणि संस्कृती खात्यातर्फे बाल कला तरंग २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रीय गायक, वाद्य आणि नृत्य विभागात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
फुदासांव संस्थेचे डॉ. पाउलो गोम्स यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी फॉमेंतो रिसॉर्ट अँड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नीता ब्रीद, गायक सोनिया शिरसाट आणि खात्याच्या अधिकारी मिताली नाईक उपस्थित होते.
गोम्स यांनी सांगितले की, यंदा प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेद्वारे शास्त्रीय कलांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य आहे. यामध्ये १२ ते १५ वर्षे आणि १६ ते २२ वर्षे अशा दोन वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असेल.
स्पर्धेत स्थानिक गोमंतकीय तसेच सध्या गोव्यात राहणाऱ्या कलाकारांना सहभागी होता येईल. वाद्य या विभागात तबला, गायन विभागात हिंदुस्थानी शास्त्रीय गायन तर नृत्य विभागात भरत नाट्यमचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धकांना आपल्या कलेचे व्हिडिओ [email protected] या ईमेल वर पाठवावे लागतील.
व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२६ असेल. व्हिडीओची लांबी कमाल ६ मिनिटे ठेवण्यात आली आहे. तर स्पर्धकांना आपली ओळख करून देण्यासाठी १ मिनिटे कालावधी असेल. दोन्ही मिळून व्हिडिओ कमाल ७ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. आलेल्या व्हिडीओंची तज्ञांच्यामार्फत छाननी केली जाईल.
अंतिम फेरीसाठी १८ ते २० स्पर्धकांची निवड केली जाईल. या स्पर्धकांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येईल. अंतिम फेरी २३ ऑगस्ट रोजी रविंद्र भवन, मडगाव येथे संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना गोव्यासह अन्यत्र संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे गोम्स यांनी सांगितले.
नीता ब्रीद यांनी सांगितले की, फॉमेंतो समूहाच्या अंजू तिंबलो यांच्या दूरदृष्टीतून या स्पर्धेची कल्पना उदयास आली. आमच्या समूहाने सदैव राज्यातील कला, संगीत, लोक कला सांभाळून ठेवण्यासाठी मदत केली आहे. मुलांना पुन्हा आपल्या मुळांकडे नेण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे.