रस्ता अपघातातील मृताच्या कुटुंबाला ३३.७० लाखांची भरपाई

वेर्णा येथे झाला होता अपघात : दक्षिण गोवा मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा आदेश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th July, 12:07 am
रस्ता अपघातातील मृताच्या कुटुंबाला ३३.७० लाखांची भरपाई

मडगाव : वेर्णा येथे झालेल्या रस्ता अपघातात प्राण गमावलेल्या दुचाकीचालक राजेश नाईक यांच्या कुटुंबाला दक्षिण गोवा मोटार अपघात न्यायप्राधिकरण न्यायालयाने ३३.७० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही रक्कम मिळेपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागणार आहे.

प्राधिकरणाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी याप्रकरणी निवाडा दिला. राजेश नाईक यांचे कुटुंब दक्षिण गोव्यातील सांकवाळ परिसरात वास्तव्यास आहेत. राजेश नाईक हे एका चिकन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचे. ते दरमहा २५ हजार रुपये कमावत होते. वेर्णा येथे दुचाकीवरून जाताना मागून येणार्‍या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ट्रकने त्यांच्या दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने राजेश नाईक यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राजेश नाईक यांची पत्नी आराधना आणि मुलगा श्रेयश यांनी न्यायालयात दाव्याचा अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक परवड लक्षात घेत भविष्यातील उत्पन्नाचे नुकसान ३२ लाख ५० हजार, पत्नी व मुलाच्या झालेल्या नुकसानासाठी ९० हजार, अंत्यसंस्कार व इतर खर्च ३० हजार रुपये अशी एकूण ३३ लाख ७० हजार रुपयांची नुकसान भरपाई ठरवली. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना संयुक्तपणे आणि वैयक्तिकरित्या ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मडगाव येथील न्यायालयाच्या खात्यात एनईएफटीद्वारे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम अदा केली जाईपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

ट्रकचालकाचा दावा फेटाळला

या खटल्यामध्ये ट्रकचालक चानबसाप्पा इराप्पा गोडाची, मालक एलजीएम एंटरप्रायझेस आणि बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते. दुचाकीस्वाराने गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे तो ट्रकसमोर आल्याचे ट्रक चालकाने बचावासाठी न्यायालयात सांगितले. तसेच गाडीत स्पीड गव्हर्नर बसवल्याचा दावाही केला. मात्र, न्यायालयाने पुरावे आणि पंचनामा तपासल्यानंतर ट्रक चालकाचा दावा फेटाळला. अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले ओरखडे आणि गाडी घासल्याच्या खुणा ९.२० मीटर लांब होत्या. यावरून ट्रक निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवला जात होता हे सिद्ध होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

हेही वाचा
सर्व पहा