Home >> गुन्हे >> मडगावात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; संशयिताला अटक!

मडगावात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; संशयिताला अटक!

पीडित वृद्धेच्या चुलत बहिणीने मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मडगावात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; संशयिताला अटक!

मडगाव : सासष्टी तालुक्यातील मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका पडक्या घराच्या साफसफाईच्या बहाण्याने नेऊन संशयिताने वृद्धेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित काशियप्पा हरिजन याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

सासष्टी परिसरात काही दिवसांपूर्वीच एका सराईत गुन्हेगाराने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा ७० वर्षीय वृद्धेला लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जुलै रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेच्या चुलत बहिणीला या प्रकाराची माहिती मिळताच तिने तातडीने मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

संशयित काशियप्पा हरिजन याने पीडितेला मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पडक्या घराची साफसफाई करण्याच्या बहाण्याने सोबत नेले होते. तिथे गेल्यावर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. दाखल तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याला गजाआड केले आहे. मडगाव पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुष्का परब या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा