वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; नीट फेरपरीक्षेचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध!

नवी दिल्ली: 'नीट-युजी २०२६' (NEET-UG 2026) च्या फेरपरीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. या निकालाने देशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा केला आहे. यंदाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्यामधील तीव्र स्पर्धा पाहता, गुणवत्ता यादीचा स्तर कमालीचा उंचावलेला दिसत आहे. संपूर्ण देशातून तब्बल ११.२१ लाख उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
गोव्याची सलोनी उटगी राज्यात पहिली!
या निकालात गोव्याच्या सलोनी उटागी हिने ९९.८४ पर्सेंटाईल गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. सलोनीने देशपातळीवरील अव्वल १३ महिला टॉपर्समध्ये मानाचे स्थान मिळवले असून, अखिल भारतीय स्तरावर (All India Rank) तिचा ३०३३ वा क्रमांक आहे. तिच्या या यशाने गोव्याच्या शैक्षणिक वर्तुळात अभिमानाचे वातावरण आहे.
मुलींचे वर्चस्व आणि देशपातळीवरील कामगिरी
यंदा मुलांच्या तुलनेत ५८ टक्क्यांहून अधिक मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पानशुल बन्सल या दोघांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर उपलक्ष्य गोयल याने देशात तिसरा क्रमांक मिळवला.
गुणवत्ता यादीचे विश्लेषण केले असता, ६९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १३८ उमेदवारांपैकी ९३ टक्के विद्यार्थी हे पहिल्याच प्रयत्नात परीक्षा देणारे होते, तर ९९ टक्के विद्यार्थी हे १७ ते १९ वर्षे या वयोगटातील आहेत.
उत्तर प्रदेशातून सर्वाधिक विद्यार्थी पात्र
भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातून सर्वाधिक म्हणजेच १.७ लाखाहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे पहिले १७ विद्यार्थी हे महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणासह आठ राज्यांमध्ये पसरलेले आहेत. ६०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार १६० इतकी आहे, तर ५०० हून अधिक गुण तब्बल ९० हजार ७८० विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत.
विद्यार्थी त्यांचे अधिकृत स्कोअरकार्ड नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करू शकतात.