Home >> ताज्या बातम्या >> अंड्यांच्या दराने ओलांडली शंभरी

अंड्यांच्या दराने ओलांडली शंभरी

१००–११० रुपये डझन; ऑम्लेट-पाव महागण्याची चिन्हे


17th July, 11:53 pm
अंड्यांच्या दराने ओलांडली शंभरी

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात अंड्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून पणजी बाजारात एका डझन अंड्यांसाठी १०० ते ११० रुपये मोजावे लागत आहेत. आम्हालाही अंडी महाग दरानेच खरेदी करावी लागत असल्याची माहिती पणजी बाजारातील विक्रेत्यांनी दिली.
महिन्याभरापूर्वी अंडी ७० रुपये डझन दराने मिळत होती. त्यानंतर आठवड्यागणिक दर वाढत गेले. ८० रुपये, ९० रुपये असा प्रवास करत आता दर ११० रुपये डझनपर्यंत पोहोचला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर अंडी बाहेरून येतात. पणजी, मडगाव तसेच इतर प्रमुख शहरांतील मोठे व्यापारी घाऊक दराने अंडी खरेदी करतात. त्यांच्याकडूनच किरकोळ विक्रेते अंडी घेतात. सध्या आम्हालाच ९० ते १०० रुपये डझन दराने अंडी खरेदी करावी लागत असल्याची माहिती अंडी विक्रेते समीर शेख यांनी दिली. अंड्यांचे दर नेमके का वाढले, याचे ठोस कारण मात्र कोणालाही माहीत नाही. बाहेरून येणाऱ्या अंड्यांचेच दर वाढल्याने आम्हालाही ते महाग विकावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या दुकानांपेक्षा हातगाड्यांवर अंड्यांची विक्री अधिक होते. पणजीसह इतर बाजारपेठांतील बहुतांश छोट्या विक्रेत्यांकडे अंडी उपलब्ध असतात. ऑम्लेट-पाव आणि रस्सा ऑम्लेट विकणाऱ्या हातगाड्यांनाही मोठ्या प्रमाणात अंड्यांची गरज असते. सध्या ऑम्लेट-पाव आणि रस्सा ऑम्लेटचे दर पूर्वीप्रमाणेच असले, तरी अंड्यांच्या किमती वाढत राहिल्यास त्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.