दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे गेल्या १९ दिवसांपासून बेमुदत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला त्यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीचे निर्देश दिले आहेत. डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक वाटल्यास तातडीने वैद्यकीय हस्तक्षेप करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयाला वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवले जात असून सरकारी डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले.
‘एससीबीए’कडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बेमुदत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. देशाला ते जिवंत, सक्रिय आणि समाजासाठी कार्यरत राहणे अधिक आवश्यक असल्याचे नमूद करत, आरोग्य धोक्यात न घालता शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांसाठी लढा सुरू ठेवावा, असे संघटनेने म्हटले आहे.