Home >> ताज्या बातम्या >> दक्षिण गोव्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत मोठी वाढ

दक्षिण गोव्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत मोठी वाढ

मागील ४ दिवसांत ९ गुन्ह्यांची नोंद; सायबर चोरांनी लुटले २६ लाख, पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
दक्षिण गोव्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत मोठी वाढ

मडगाव: राज्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे सत्र वेगाने वाढत चालले आहे. गेल्या काही महिन्यांत सायबर चोरांनी नागरिकांना विविध आमिषे दाखवून, खोट्या जाहिरातींद्वारे विश्वास संपादन करत वैयक्तिक माहिती मिळवून लाखो रुपयांची लूट केली आहे. मडगाव, म्हार्दोळ, कुंकळ्ळी, मायणा-कुडतरी आणि काणकोण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील चार दिवसांत सायबर फसवणुकीचे एकूण ९ गुन्हे दाखल झाले असून, नागरिकांना तब्बल २६,३७,७८६ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण गोवा पोलिसांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. तपासातील सुलभतेसाठी, सायबर पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारी आता संबंधित भागातील स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये वर्ग करून गुन्हे नोंदवले जात आहेत. मागील चार दिवसांत घडलेले फसवणुकीचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

संमतीशिवाय खात्यातून १.६० लाख गायब

मायणा-कुडतरी पोलीस ठाणे परिक्षेत्रातील भाटी-कुडतरी येथील नॅन्सी मेलिटा कार्दोज यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय १.६० लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले.

पार्टटाईम नोकरीचे आमिष

नुवे-सासष्टी येथील विओला इव्हा फर्नांडिस यांना फेसबुकवर अर्धवेळ (पार्टटाईम) नोकरीची जाहिरात दिसली. सुरुवातीला काही रेटिंगची कामे करून घेऊन विश्वास जिंकण्यासाठी सायबर चोरट्याने त्यांना ५ हजार रुपये दिले. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल ४,४७,५०० रुपये उकळले.

बनावट एपीके (APK) फाईलमुळे फोन हँग

नावेली येथील हर्कुलानो हे मोबाईल पाहत असताना त्यांना 'कुकू अ‍ॅप'ची एक एपीके फाईल दिसली. त्यांनी ती डाऊनलोड केली. मात्र, संशय आल्याने त्यांनी बॅक घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फोन हँग झाला होता. चोरट्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन बँक खात्यातून १.९६ लाख रुपये चोरले.

बनावट स्क्रीनशॉट दाखवून सोन्याची साखळी लांबवली

मडगावच्या न्यू मार्केटमधील 'श्री साई ज्वेलर्स'मध्ये आदित्य गायकवाड नावाच्या एका भामट्याने ग्राहक म्हणून प्रवेश केला. त्याने दुकान मालक प्रितम बांदोडकर यांना मोबाईलवर एनईएफटी (NEFT) पेमेंट यशस्वी झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवला आणि ३,५६,५८६ रुपये किमतीची सोन्याची साखळी घेऊन पळ काढला.

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महाग

नावेली येथील एका तरुणीला इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मैत्री करून आणि भावनिक कारणे सांगून त्याने युवतीकडे पैशांची मागणी केली. तरुणीने वेगवेगळ्या यूपीआय (UPI) आयडीवर एकूण ३.३८ लाख रुपये पाठवले. पैसे मिळताच संशयिताने संपर्क तोडला.

फ्री क्रेडिट कार्डचे आमिष

केपे येथील क्लिम फर्नांडिस यांना फ्री क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने व्हॉट्सअ‍ॅपवर एक एपीके लिंक पाठवण्यात आली. त्यांना स्क्रीन शेअर करायला सांगून आणि कागदपत्रे अपलोड करायला लावून सायबर चोराने ओटीपी मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक व क्रेडिट कार्ड खात्यात अनाधिकृत प्रवेश मिळवून २.२६ लाखांची फसवणूक केली.

फेसबुक इन्व्हेस्टमेंट फ्रॉड

माशेल-फोंडा येथील शमीर देवगिरी यांनी फेसबुकवरील गुंतवणुकीची जाहिरात पाहून संपर्क केला. अधिक परताव्याच्या आमिषाने त्यांनी अनेक ऑनलाईन व्यवहारांद्वारे ३.५२ लाख रुपये गुंतवले, मात्र त्यानंतर सायबर चोराने संपर्क तोडून त्यांची फसवणूक केली.

क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स घोटाळा

माशेल येथील कृष्णा नाईक यांना अ‍ॅक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचा बनावट फोन आला. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करण्याच्या बहाण्याने त्यांना एका खोट्या वेबसाईटवर लॉगइन करण्यास सांगण्यात आले. त्या ठिकाणी कार्डचे तपशील (डिटेल्स) भरताच त्यांच्या खात्यातून १.८० लाख रुपये काढून घेण्यात आले.

गॅस बिल भरण्याच्या नावाखाली लूट

वेळ्ळी-सासष्टी येथील अरुणा फर्नांडिस यांना व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून घरगुती गॅसचे थकीत बिल भरण्यास सांगण्यात आले. त्यासाठी पाठवलेले एक अ‍ॅप त्यांनी डाऊनलोड केले आणि कार्डचे तपशील भरले. त्यानंतर त्यांच्या पती आणि मुलाच्या खात्यांतून मिळून एकूण २,२३,२०० रुपये लुटण्यात आले.

बँकिंग अ‍ॅप हॅक

माशेल-काणकोण येथील विलास पावसकर यांच्या मोबाईलमधील बँकिंग अ‍ॅप्लिकेशनचा अज्ञात व्यक्तीने ताबा मिळवला आणि खात्यातून ९८,५०० रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली.

मोबाईल अपडेट लिंक पडली महाग

श्रीस्थळ-काणकोण येथील सालुजुस फर्नांडिस यांना मोबाईल अपडेटसाठी आलेली लिंक ओपन करताच त्यांचा मोबाईल रिस्टार्ट झाला. त्यानंतर त्यांच्या गुगल पे अ‍ॅपवरून भवीनकुमार शशिकांतभाई पटेल नावाच्या खात्यावर ९०,००० रुपये परस्पर वळवण्यात आले.

पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

दक्षिण गोवा पोलिसांकडून सायबर चोऱ्या रोखण्यासाठी वेळोवेळी जागृतीपर शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मात्र, चोरटे वेगवेगळे मार्ग अवलंबून फसवणूक करत असल्याने पोलिसांनी नागरिकांना खालील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:

* मोबाईल अपडेट, बिल पेमेंट किंवा लॉटरीच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नये.

* गुगल प्ले स्टोअरशिवाय इतर कोणत्याही अनोळखी स्रोतावरून, व्हॉट्सअ‍ॅपवरून किंवा ब्राउझरमधून अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका; यामुळे फोन हॅक होऊ शकतो.

* बँक अधिकारी कधीही स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करायला सांगत नाहीत.

* आपला वैयक्तिक ओटीपी (OTP), पिन (PIN) आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये.

हेही वाचा
सर्व पहा