घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे अंजुणे धरण ७५ टक्के भरले

९२ मीटरनंतर पाणी सोडणार : मामलेदारांनी घेतला स्थितीचा आढावा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
05th August, 11:42 pm
घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे अंजुणे धरण ७५ टक्के भरले

वाळपई : सत्तरी तालुक्यासह घाटमाथ्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजुणे धरणाच्या जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या जलाशय सुमारे ७५ टक्के भरला असून पाण्याची पातळी ८८ मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरणातील पाण्याची पातळी ९२ मीटरवर पोहोचल्यानंतर आवश्यक ती पूर्वसूचना देऊन टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या कोणत्याही प्रकारचा धोका नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सत्तरी तालुक्याचे मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी अंजुणे धरण प्रकल्पाला भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून धरणातील वाढणारी पाण्याची पातळी, हवामानाचा अंदाज, पाण्याच्या विसर्गाची तयारी आणि आपत्कालीन उपाययोजनांची माहिती घेतली. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेऊनच पाण्याचा विसर्ग करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उत्तर गोव्यासाठी जीवनदायी ठरणारा प्रकल्प

सत्तरी तालुक्यातील अंजुणे परिसरात उभारण्यात आलेले अंजुणे धरण उत्तर गोव्याच्या पाणीपुरवठा आणि जलसिंचन व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. पावसाळ्यात या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करण्यात येतो. उन्हाळ्याच्या काळात याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी, विविध सिंचन योजनांसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी केला जातो.

यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्यामुळे काही दिवस अंजुणे धरणातील पाणीसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर आला होता. जलाशयात अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सिंचनाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला असून धरण झपाट्याने भरू लागले आहे. त्यामुळे जलसिंचन विभागासह प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

आठ दिवसांत २५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्यात वाढ

गेल्या आठ दिवसांत घाटमाथ्यावर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. घाट परिसरात सातत्याने पाऊस सुरू राहिल्यास पाण्याची पातळी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पाण्याची पातळी ८८ मीटरवर असून पुढील काही दिवसांत ती ९२ मीटरच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचू शकते. आतापर्यंत परिसरामध्ये २३८८ मिलिमीटर पाऊस लागलेला आहे.

९२ मीटरनंतर पूर्वसूचना; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

जलाशयातील पाण्याची पातळी ९२ मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर प्रथम प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात येईल. त्यानंतर परिस्थितीनुसार धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडून पाण्याचा विसर्ग केला जाईल. पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी वाळवंटी नदीच्या काठावरील गावांतील नागरिक, ग्रामपंचायती, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला आणि संबंधित विभागांना पूर्वसूचना दिली जाणार आहे.

मामलेदारांकडून परिस्थितीवर लक्ष

अंजुणे धरणाच्या पाहणीनंतर मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी सांगितले की, धरणाची सद्यस्थिती समाधानकारक असली तरी हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही वेळी वेगाने वाढू शकते. त्यामुळे अंतिम टप्प्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जलसिंचन विभागाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.