मडगाव : काणकोण पोलिसांनी एमडीएमए अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी संशयित मोहम्मद झिदान व साहिल कुर्डीकर या दोघा संशयितांना अटक केली होती. याप्रकरणी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. काणकोण पोलिसांनी २९ जुलै रोजी काणकोण येथील चाररस्तानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग ६६च्या पुलाखाली छापा टाकत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसांना त्यांच्याकडून एकूण ३.४ ग्रॅम एमडीएमए अमलीपदार्थ सापडले होते, ज्याची किंमत सुमारे ३४ हजार होते.
मोहम्मद झिदान व्ही. एम. (२५, रा. कासरगोड-केरळ; सध्या साळगाव) याच्याकडून १.५ ग्रॅम व साहिल कुर्डिकर (२५, मूळ भाटी-सांगे; सध्या कळंगुट) याच्याकडून १.९ ग्रॅम एमडीएमए जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध अमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता.
संशयिताच्या वकिलांनी, जप्त केलेले अमलीपदार्थांची मात्रा व्यावसायिक नाही. संशयितांचे वय लक्षात घेत त्यांना जामीन मिळावा, अशी विनंती संशयितांच्या वकिलांनी केली. सरकारी वकिलांनी याला विरोध करत अमली पदार्थांच्या मुख्य स्रोताचा शोध घेण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, काणकोणच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. पोलिसांना आवश्यक चौकशी पोलीस कोठडीत न ठेवताही केली जाऊ शकते, असे नमूद करत न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
न्यायालयाने संशयितांना घातल्या अटी
न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचे हमीदार सादर करणे, संशयितांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती न्यायालयात द्यावी, तपासकामात सहकार्य करणे, जामीन मिळाल्यानंतर पुढील पाच दिवस काणकोण पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, अशा अटी घातलेल्या आहेत.


