काम सोडल्याने सलुन कामगाराचे अपहरण

मालकिणीसह चार जणांना अटक : कळंगुट पोलिसांची कारवाई

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
06th August, 11:55 pm
काम सोडल्याने सलुन कामगाराचे अपहरण

म्हापसा : कळंगुट येथे सलुन मधील काम सोडल्याच्या कारणावरून अंकित कुमार याला अपहरण तसेच त्याच्या फिर्यादी मित्राला मारहाण आणि २७ हजार रुपये खंडणी रक्कम उकळण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी सलूनच्या मालकिणीसह चार जणांना अटक केली आहे.
हा प्रकार बुधवारी उत्तररात्री २.३० च्या सुमारास घडला. याप्रकरणी रवींद्र यादव (रा. गौरावाडा कळंगुट व मूळ राजस्थान) यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन महिलांसह ६ ते ७ अज्ञात संशयितांनी फिर्यादी यादव यांच्या कामत हॉलिडे होम मधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र अंकित कुमार यांना दंडुके व पाईपने मारहाण केली. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली व भीती घालून २७ हजार रुपये उकळले.
संशयितांनी अंकित कुमारला मारहाण व लुटालूट केल्यानंतर त्याचे अपहरण केले आणि त्याला एका अज्ञात स्थळी डांबून ठेवले. पीडित अंकित कुमार हा संशयित आरोपी सरस्वती सीतापुरे हिच्या सलूनमध्ये कामाला होता. त्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक काम सोडल्यामुळे संतप्त झालेल्या मालकिणीने हा प्रकार घडवून आणल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.पोलिसांत तक्रार दाखल करताच संशयितांचा पोलिसांनी शोध घेतला व पीडिताची सुटका केली. तसेच वरीच चारही संशयित आरोपींना अवघ्या काही तासांत पकडून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.मया ११५(२), १४०(४), ३३३, ३०८(५), ३५१ व ३(५) कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. इतर संशयितांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश कांदोळकर हे करत आहेत.
चार संशयित आरोपी गजाआड
कळंगुट पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून पीडित अंकितची सुटका केली आणि अवघ्या काही तासांत संशयित सरस्वती किशोर सीतापुरे (३२, नायकावाडा, कळंगुट), साई संतोष जाधव (२३), सुशील नरहरी सदाफुले (२३) व गुरविंदर सरदार हरजिंदर सिंग (४३ तिघेही रा. कांदोळी) या चार आरोपींना अटक केली.      

हेही वाचा
सर्व पहा