पणजी : कॅसिनोत ‘अंदर बाहर गेमिंग टेबल’ सुरू करून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गोपाळ नाईक (कुंडई-फोंडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पर्वरी गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या गोपाळ नाईकने गोवा कोस्टल रिसॉर्ट्स अँड रिक्रिएशन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अशोक वाडिया यांच्याशी आपले निकटचे संबंध असल्याचे भासवून संबंधित व्यावसायिकाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. दरम्यान नाईक याला नोटीस जारी करून २३ रोजी सायंकाळी पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कर्नाटकातील ललित भुराथ या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तक्रारदार भुराथ यांना गोव्यातील कॅसिनो व्यवसायात स्वारस्य होते. याची माहिती मिळाल्यानंतर गोपाळ नाईक याने त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला गोवा कोस्टल रिसॉर्ट्स अँड रिक्रिएशन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक अशोक वाडिया यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे भासवले व कॅसिनोमध्ये ‘अंदर बाहर गेमिंग टेबल’ सुरू करून देण्याची तसेच त्यातून मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याची हमी त्याने दिली. या आमिषाला भुलवून नाईक याने १ डिसेंबर २०२५ रोजी भुराथ यांच्याकडून एकूण १ कोटी रुपये उकळले. मात्र, रक्कम दिल्यानंतरही ठरल्याप्रमाणे कॅसिनोमध्ये गेमिंग टेबल सुरू झाले नाही.
मात्र, मोठी रक्कम देऊनही ठरल्याप्रमाणे कॅसिनोमध्ये गेमिंग टेबल सुरू झाले नाही. काही दिवस वाट पाहिल्यानंतर जेव्हा तक्रारदाराने आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पणजी पोलिसात तक्रार दाखल केली.
उद्या पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस
या प्रकरणी निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नाईक यांनी गोपाळ नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी गोपाळ नाईक याला नोटीस बजावून २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस स्थानकात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.


