यलाम्मा डोंगरावरील दुकानांवर कारवाई करताना अधिकारी.
बेळगाव : सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत दुकानांवर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मंदिर प्राधिकरणाच्या मुख्य अधिकारी प्रभावती फक्कीरपूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रकरणी सर्व अस्वच्छ व भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचा वीज व पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच संबंधितांवर थेट एफआयआर नोंदवून क्रिमिनल गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी २१५ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू असून, पुढील ६ ते ८ महिन्यांत आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. प्राधिकरणाकडे कारभार हस्तांतरित होत असताना सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. येत्या आठवड्यात स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांनी जाहीर केले असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला. दरम्यान, सौंदत्ती यलम्मा डोंगरावर गोव्यातून दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात.
कालबाह्य खाद्यपदार्थ जप्त
यल्लम्मा डोंगर परिसरातील किराणा दुकाने, पूजा साहित्य विक्री केंद्रे आणि उपाहारगृहांची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी मुदत संपलेली शीतपेये, कालबाह्य खाद्यपदार्थ, निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री होत असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या व्यापारी संकुलातील शौचालयांचा साठवणूक आणि स्वयंपाकघरासाठी वापर होत असल्याचेही निदर्शनास आले.


