पणजी : पर्वरी येथील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही जुन्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कायम राहिला आहे. उड्डाणपुलावर दुचाकींना घातलेल्या निर्बंधामुळे या वाहनांची वाहतूक पुन्हा जुन्या रस्त्यावर वळली आहे. त्यामुळे ओ कोकेरो, डॅमियन दी गोवा, गिरी या महत्त्वाच्या चौकांवर वाहतुकीचा ताण कायम आहे.
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर अपघात घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुचाकींना उड्डाणपुलावरून जाण्यास निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पणजी आणि पर्वरीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना पुन्हा जुन्या मार्गाचा वापर करावा लागत आहे. परिणामी या मार्गावरील वाहनांची संख्या वाढली आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
ओ कोकेरो चौकात सिग्नलचा अभाव; गुंतागुंतीत भर
ओ कोकेरो चौकात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे. विविध दिशांनी येणारी वाहने तसेच महामार्गावर प्रवेश करणारी आणि बाहेर पडणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्र येत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. गर्दीच्या वेळेत येथे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.
डॅमियन दी गोवा, गिरीमध्येही ताण
डॅमियन दी गोवा चौकातून महामार्गाला जोडणाऱ्या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे चौकातून ये-जा करताना वाहनचालकांना अधिक वेळ लागत आहे. गिरी चौक परिसरातही जुन्या मार्गावर परतलेल्या वाहतुकीमुळे वाहनांची संख्या वाढली आहे. या संपूर्ण पट्ट्यात वाहतूक कोंडीची शक्यता वाढली आहे.
उड्डाणपुलामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी दुचाकींवरील निर्बंधामुळे त्याचा काही भार पुन्हा जुन्या मार्गावरील चौकांवर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित चौकांवर वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


