पणजी : न्यायदानाच्या प्रक्रियेस विलंब झाल्यास नागरिकांवर त्याचा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळेत न्याय मिळणे आवश्यक आहे. यासाठी या प्रक्रियेत अनावश्यक उशीर करणे कमी झाले पाहिजे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सुलभ झाली पाहिजे असे मत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केले. केंद्रीय न्याय आणि कायदा खात्यातर्फे आयोजित दिशा २.० योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल व अन्य अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, लोकांना समजेल अशा भाषेत आणि सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीची असणे आवश्यक आहे. नागरिकांची गरज ओळखून विधिमंडळात कायदे केले जातात. कायदे समाजातील वास्तवतेशी निगडीत असले पाहिजेत.
अशा कायद्यांची भाषा लोकांना समजेल अशीच असली पाहिजे. यामध्ये अनावश्यक गुंतागुंत नसावी. न्यायाची प्रक्रिया सर्वांना सुलभपणे उपलब्ध झाली पाहिजे. अन्याय झाल्यास लोकांमध्ये आपण सहजपणे न्याय संस्थांकडे जाऊ शकतो हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. यासाठी न्यायसेतू प्लॅटफॉर्म हा एक अभिनव उपक्रम आहे.
ते म्हणाले, सध्याच्या काळात न्यायदान प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. मात्र न्यायदानाचे काम हे तंत्रज्ञान नव्हे, तर मनुष्यच चांगले करू शकतात हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. तंत्रज्ञान हे न्यायदानाचे माध्यम असू शकते. मात्र ते या प्रक्रियेतील मानवाला पर्याय नाही आहे.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याची न्यायव्यवस्था आजच्या तरुण पिढीवर अवलंबून आहे. आपण त्यांना कायद्याच्या ज्ञानासोबतच संविधानाप्रती आदर, एकता, मानवी प्रतिष्ठा आधी मूल्ये देखील समजावून सांगितली पाहिजेत.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, गोव्यातील कायदा विभाग चांगले काम करत आहे. येथील अधिकाऱ्यांनी दिशा २.० ची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली आहे. या उपक्रमाबद्दल काही सूचना असल्यास त्या केंद्रीय खात्याला कळवाव्यात. त्यावर आम्ही नक्कीच विचार करू.
१९०८ मध्ये ब्रिटिश सरकारने अरविंद घोष यांच्यावर बॉम्बस्फोटाचे कारस्थान केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. तेव्हा सी आर दास या वरिष्ठ वकिलांनी चांगला युक्तिवाद केल्याने घोष यांची निर्दोष सुटका झाली होती. आजच्या तरुणांनी सी आर दास यांच्या आदर्श घेणे आवश्यक आहे.


