२००८साली पोटनिवडणुकीत पाळी मतदारसंघात काँग्रेस-भाजपमध्येच झाली थेट लढत : सावईकर

२००८ मधील पाळी पोटनिवडणुकीत मगोपचा उमेदवार नसल्याचे सांगत भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी मंत्री सुदीन ढवळीकर यांचा दावा फेटाळला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पाळीचा साखळी मतदारसंघ झाला होता.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
२००८साली पोटनिवडणुकीत पाळी मतदारसंघात काँग्रेस-भाजपमध्येच झाली थेट लढत : सावईकर

पणजी : सध्या गोव्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या रंगल्या आहेत, २००८ च्या पाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून एक नवा राजकीय वाद समोर आला आहे. मगोपचे नेते आणि मंत्री सुदीन ढवळीकर यांनी मागेच  केलेल्या दाव्याला भाजपचे माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी जुन्या निवडणूक रेकॉर्डचा दाखला देत पूर्णपणे फेटाळून लावले आहे. २००८ मधील पाळी पोटनिवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (MGP) कोणताही अधिकृत किंवा प्रमुख उमेदवार रिंगणात नव्हता आणि त्या निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत व काँग्रेसमध्येच थेट लढत झाली होती, असा खुलासा सावईकर यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे केला आहे. आगामी निवडणुकीत मगोप-भाजपच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले. 

घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार, पाळी मतदारसंघातील तत्कालीन आमदार गुरुदास गावकर यांच्या निधनामुळे २००८ मध्ये तिथे पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रताप गावस आणि भाजपतर्फे डॉ. प्रमोद सावंत यांच्यात थेट सामना झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रताप गावस यांना ७,८६७ मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते, तर भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना ६,३३३ मते मिळाली होती. भाजपचे माजी आमदार डॉ. सुरेश आमोणकर यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी मिळवलेल्या ३,६८२ मतांमुळे भाजपच्या पारंपारिक मतपेढीचे विभाजन झाले आणि काँग्रेसचा विजय सुकर झाला. चौथ्या क्रमांकावर सेव्ह गोवा फ्रंटचे जुझे लोबो होते, ज्यांना अवघी १५८ मते मिळाली होती. सुमारे १५३४ मतांच्या फरकाने डॉ. प्रमोद सावंत यांचा पराभव झाला होता. या संपूर्ण निवडणुकीत मगोपचा कोणताही उमेदवार शर्यतीत नसल्यामुळे, मगोपच्या उमेदवारामुळेच भाजपचा पराभव झाला हा ढवळीकरांनी केलेला दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

२००८ साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि 'साखळी' मतदारसंघ अस्तित्त्वात आला

२००८ च्या या पोटनिवडणुकीनंतर मतदारसंघांच्या पुनर्रचनेची (Delimitation) प्रक्रिया पार पडली आणि त्यातून 'साखळी' हा नवीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तत्कालीन पाळी मतदारसंघातील २००८ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे प्रताप प्रभाकर गावस हे साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आमदार ठरले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मगोप आणि भाजप युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सावईकर यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. सध्याच्या घडीला युती किंवा जागावाटपाबाबत कोणतेही भाष्य करणे अत्यंत घाईचे ठरेल, असे सांगत सध्याचे सरकार सुरळीत चालवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात युतीबाबतचा कोणताही निर्णय योग्य वेळी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्वच घेईल, असे सांगत त्यांनी या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

तत्पूर्वी, मगोप नेते सुदीन ढवळीकर यांनी पक्षाचा जनाधार भक्कम असल्याचे सांगत वेगळी भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपसोबतच्या युतीमुळेच मगोपला राजकीय ताकद आणि सत्ता मिळाल्याचे विधान केले होते. त्याला उत्तर देताना ढवळीकर म्हणाले की, राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मगोपचे किमान तीन हजार निष्ठावंत मतदार आहेत. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मगो पक्षाने केलेले कार्य आजही जनतेच्या आणि तरुण पिढीच्या मनात जिवंत आहे. मगोपच्या उमेदवारामुळेच यापूर्वी २००८ साली पाळी मतदारसंघात प्रमोद सावंत यांचा पराभव झाला होता, असा दावा ढवळीकरांनी केला होता. सध्या मगोपकडून साखळीसह विविध मतदारसंघांत उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.


हेही वाचा
सर्व पहा