तारक आरोलकर म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल

छातीत दुखू लागल्याची तक्रार; आसगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाख़ल केले आहे. गुन्हा शाखेने अटक केल्यानंतर सध्या आरोलकर कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
44 mins ago
तारक आरोलकर म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल

म्हापसा : आसगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला म्हापसा येथील उत्तर गोवा  जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाख़ल केले आहे. गुन्हा शाखेने अटक केल्यानंतर सध्या आरोलकर  कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता.

 आज सोमवारी दुपारी कैदी आरोलकर याने छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. आपतकालीन विभागात तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी इस्पितळात अ‍ॅडमीट केले आहे. सध्या आरोलकरवर इस्पितळातील पुरूष वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.

  दरम्यान, फिर्यादी पंकज बजाज (रा. दिल्ली) यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा शाखेने गेल्या महिन्याच्या  १७ ऑगस्टला तारक आरोलकर विरूध्द भा.दं.सं.चे कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा नोंद केला होता. नंतर १९ ऑगस्टला आरोलकर याला अटक केली होती.

हा फसवणुकीचा प्रकार २ नोव्हेंबर २०२२ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला होता. संशयित आरोपीने आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमिनीचे मालक व अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवून आणि विश्वास संपादन करून जमिनीचा बनावट विक्री करार फिर्यादींना दाखवला. त्यानंतर जमीन खरेदीची आगाऊ ४० लाख रुपये रक्कम घेऊनही विक्री करारपत्र पूर्ण केले नाही.

आणि रक्कम परत केली नाही. नंतर सदर जमीन ही जोजफ मारियान डिसोझा उर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे उघड होताच फिर्यादींनी गुन्हा शाखेत रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हा फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आणखी एक गुन्हा दाखल

 दरम्यान, ओबीसी दाखला मिळवण्यासाठी वडिलांचा बनावट जन्म दाखला सादर केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने तारक आरोलकर विरूध्द आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. तर तोरसे, पेडणे येथील जमीन विकायची असल्याचे भासवून मुरगावातील एका महिलेला ४१.८५  लाख रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी आरोलकर विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

तसेच धारगळ येथील जमीन विक्री करण्याच्या बहाण्याने  बंगळुरू मधील एका रिअल इस्टेट कंपनीची ८ कोटी रूपयांची फसवणूकप्रकरणी आरोलकरविरूध्द सदाशिव (कर्नाटक) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.    

हेही वाचा
सर्व पहा