मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अंत्यसंस्कारासाठी ठेवले रोख ३० हजार रुपये

‘सुसाईड नोट’ही आढळली​ : मोखर्ड-काणकोण येथील दोघा वृद्ध बहिणींनी आत्महत्या केल्याचा संशय

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अंत्यसंस्कारासाठी ठेवले रोख ३० हजार रुपये

मोखर्ड येथील दाट वस्तीतील या घरात दोन्ही बहिणींचा मृतदेह सापडला होता.

काणकोण : मोखर्ड-काणकोण येथील मूळ घरात मृतावस्थेत आढळलेल्या वयोवृद्ध रेखा कामत (७८) व मेधा कामत (७२) या बहिणींवर सोमवारी मडगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती काणकोण पोलीस स्थानकाचे निरीक्षक तेरॉन डिकॉस्टा यांनी दिली.

दोन्ही बहिणींचे मृतदेह सापडलेल्या घराची पोलिसांनी तपासणी केली असता सुसाईड नोट आणि ३० हजार १०० रुपये आढळले. या रकमेचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी करावा, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच क्लिनिकल रसायन असलेली अर्धवट भरलेली बाटलीही आढळली.

काणकोण पोलिसांना शवचिकित्सा अहवालाची प्रतीक्षा 
या क्लिनिकल रसायनाचे सेवन केल्यामुळे दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज काणकोण पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांना सुमारे पाच दिवसांपूर्वी मृत्यू आला असावा, असाही अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा