पेडणे : न्यू वाडा, मोरजी येथील रस्त्यालगत असलेल्या एका बारमध्ये पहाटेपर्यंत कर्णकर्कश संगीत सुरू ठेवले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या ठिकाणी काही विदेशी पर्यटक रात्री उशिरापर्यंत दंगामस्ती करत रस्त्यावर फिरत असल्याच्याही स्थानिकांच्या तक्रारी आहेत.
नशेत असल्याचे दिसणाऱ्या एका पर्यटकाने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र दोन्ही वाहने रस्त्याच्यामध्ये पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
पहाटेपर्यंत सुरू ठेवत असलेल्या कर्णकर्कश संगीतावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच रस्ते सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.


