मुंबई : डोंबिवलीतील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत तडीपार करून महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार म्हात्रेचा मुक्काम आता उत्तर गोव्यातील बागा-कळंगुट परिसरातील एका रिसोर्टमध्ये असणार आहे.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. तसेच गोव्यात वास्तव्यास असताना त्याला दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी हणजूण पोलीस स्थानकात हजेरी लावणे बंधनकारक असेल.
याशिवाय, न्यायालयाने त्याचा पासपोर्ट सत्र न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकरणाची सुनावणी कल्याण येथील फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हे प्रकरण डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण झाल्याच्या घटनेशी संबंधित आहे. या प्रकरणात रमेश म्हात्रेला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आता उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेसह इतर संशयितांनाही अटींसह जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने सर्व संशयितांना ते ज्या राज्यात वास्तव्यास असतील, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्थानकात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत. रमेश म्हात्रे यांच्या वतीने उच्च न्यायालयात गोव्यात मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गोव्यातही हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.


