पणजी : सत्तरीतील बंदी असलेल्या तोणीर काजरेधाट येथे धबधबव्यावर पावसाळी सहलीसाठी आलेल्या वास्कोतील विद्यार्थ्यांच्या गटातील राहुल बिंद (१७ वर्षे) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरक्षेत हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे तर दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

विद्यार्थ्याच्या अकाली निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याचबरोबर बंदी असलेल्या धबधब्यावर विद्यार्थ्यांना घेऊन गेलेले शिक्षक, विद्यालय व्यवस्थापन व स्थानिक एजंटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. वाळपई पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यानंतर चार शिक्षकांसह दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर दोघा टूर ऑपरेटरना अटक केली.
काल शुक्रवारी वरील घटना घडली होती. वास्कोतील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा, बायणा येथील ४० विद्यार्थी आणि शिक्षकांचा गट पावसाळी सहलीसाठी सत्तरीत गेला होता. त्यावेळी तोणेर, काजरेघाट येथे धबधब्यावर बुडाला होता. त्यानंतर अग्निशामक दल, वाळपई पोलीस तसेच स्थानिकांनी एकत्र येऊन शोधमोहीम राबवल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. बंदी असलेल्या धबधब्यावर ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली होती. आणि त्याच्या सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दरम्यान, चार शिक्षक व दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर याप्रकरणी पोलीस निरीक्षक विदेश पिळगावकर यांच्या देखरेखीखाली आणि उपअधीक्षक श्रीदेवी बीव्ही व पोलीस अधीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलीस अधिक तपास करीत आहेत.


