पर्यावरण पुरक गणेश चतुर्थीसाठी केवळ चिकण मातीचे गणपती घ्यावेत : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
पर्यावरण पुरक गणेश चतुर्थीसाठी केवळ चिकण मातीचे गणपती घ्यावेत : मुख्यमंत्री

 पणजी : गणेश चतुर्थी हा पर्यावरणाचा सण आहे. माटोळीमध्ये निसर्गातील विविध गोष्टींचा वापर केला जातो. गोमंतकीयांनी केवळ चिकण मातीचे गणपतीच्या मूर्ती घ्याव्यात.  यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच स्थानिक कारागिरांना लाभ होईल. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर प्रशासन कडक कारवाई करत आहे. पीओपी मुर्त्या घेणेच बंद केले तर त्यांची विक्री देखील होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. 

शनिवारी स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत त्यांनी हस्तकला कारागिरांसोबत वेबिनारद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार हस्तकला कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्य विकास करत आहे. राज्यातील पारंपारिक मूर्तीकारांना आर्थिक मदत, यंत्रे दिली जात आहेत.

नुकतेच राज्यातील कारागिरांना सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यांना गोमई तसेच कागदापासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. असे पर्यावरण पूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे. पीओपी पर्यावरणासाठी घातक आहेतच, शिवाय अशा मुर्त्या पाण्यात बुडवल्या तरी दोन दिवसांनी पुन्हा बाहेर येतात. 

पाण्याबाहेर आलेल्या पीओपी मुर्त्या काढणे हे खूप कठीण काम आहे. आपण सर्वांनी चिकण मातीच्या मुर्त्या घेतल्यास चित्रशाळा चालवणाऱ्या कुंभार समाजातील लोकांना आर्थिक फायदा होईल. याशिवाय अनेक कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून रोपटे दिले जाते.

यासाठी वापरण्यात आलेली कुंडी अथवा भांडे हे प्लास्टिक, पीओपी अथवा सिरॅमिकची असते. या घटकांचे निसर्गात विघटन होण्यास हजार वर्षांचा कालावधी लागतो. यामुळे रोपट्यांची भांडी, कुंड्या देखील चिकण मातीच्या असल्या पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

हस्तकलेत कोट्यवधींचा फायदा 

मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही वर्षांत गोव्यातील हस्तकला उत्पादनांची मागणी वाढली आहे. दरवर्षी राज्यातून कोट्यवधी रुपयाची हस्तकला उत्पादने विदेशात निर्यात होत आहेत. यामुळे राज्यातील युवा पिढीने पारंपारिक हस्तकलेकडे एक व्यवसाय संधी म्हणून पहावे. यासाठी सरकार सर्व ती मदत करण्यास तयार आहे. 

डिसेंबरमध्ये उद्घाटन 

स्थानिक हस्तकला कारागिरांना प्रशिक्षण देणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे गोवा हट आणि कुणबी व्हिलेज उभारले जात आहे. येत्या डिसेंबर महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना देखील गोव्यातील हस्तकला उत्पादने सहज उपलब्ध होतील.

हेही वाचा
सर्व पहा