छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या आगामी राजकीय आणि सामाजिक प्रवासाची दिशा स्पष्ट केली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत ‘दबाव गट’ म्हणून काम करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत ही घोषणा करत 'क्या बोलती पब्लिक' या नव्या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली.
येत्या सप्टेंबर महिन्यापासून ही व्यापक मोहीम महाराष्ट्रभर तसेच संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे. या मोहिमेच्या केंद्रस्थानी बिघडलेली शिक्षण व्यवस्था आणि महागडे शिक्षण शुल्क हे मुद्दे असतील.
शिक्षणातील वाढत्या व्यापारीकरणावर आणि महागड्या शिक्षण पद्धतीवर अभिजित दीपके यांनी जोरदार घणाघात केला. पत्रकार परिषदेत बोलताना दिपके म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा हा आमच्या मोहिमेचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असेल. आज देशात शिक्षण हा एक अत्यंत महागडा व्यवसाय बनला आहे. अगदी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वर्षाला १ ते २ लाख रुपये फी वसूल केली जात आहे आणि त्याशिवाय डोनेशनचा जाचक खर्च वेगळाच! ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्नच मर्यादित आहे, त्यांनी मुलांच्या शाळांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून?
शालेय शिक्षणासोबतच महाविद्यालयीन शिक्षण आणि कोचिंग क्लासेसच्या नावाखाली पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्याची गरज दिपके यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षणासाठी पालकांना बँकांची महागडी कर्जे काढावी लागत असून, यामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. पालकांवरील हा आर्थिक ताण कमी करणे आणि शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे हाच या मोहिमेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनमत तयार करून सरकारवर आणणार दबाव
‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेअंतर्गत कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते देशभरात फिरून नागरिक, विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण महाग करणाऱ्या घटकांविरोधात आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात व्यापक जनमत तयार करून सरकारवर राजकीय व सामाजिक दबाव आणण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.


