मध्यप्रदेश : ₹२१ कोटींची क्रिप्टो गुंतवणूक फसवणूक; भाजप नेत्याला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
मध्यप्रदेश : ₹२१ कोटींची क्रिप्टो गुंतवणूक फसवणूक; भाजप नेत्याला अटक

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणांपैकी एक असलेल्या ₹२१.०५ कोटींच्या क्रिप्टो गुंतवणूक घोटाळ्यात राज्य सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपशी संबंधित नेते व शाजापूर जिल्हा परिषद सदस्य जगदीश कुमार मालवीय यांना अटक केली आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील ₹५० लाख संशयिताच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघड झाले आहे.

ग्वाल्हेर येथील ७० वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अशोक विजयवर्गीय यांना ‘क्रिप्टो करन्सीत’ गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेने संपर्क साधला. डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत त्यांनी १०६ व्यवहारांद्वारे ७६ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ₹२१ कोटी ५ लाख ९२ हजार रुपये हस्तांतरित केले.

सुरुवातीला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र, पैसे परत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे संशय आल्याने विजयवर्गीय यांनी राज्य सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान फसवणुकीतील काही रक्कम शाजापूर येथील संशयित जगदीश कुमार मालवीय यांच्या खात्यात गेल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील चौकशीसाठी कोठडी मिळवली आहे.

प्राथमिक तपासात संशयिताच्या बँक खात्यात ₹२.५० कोटींहून अधिक संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळले आहेत. त्यामुळे त्याचे खाते इतर सायबर फसवणूक प्रकरणांतही वापरण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

तपासात संशयित नुकताच सहकाऱ्यांसह बँकॉक (थायलंड) येथे फिरून आल्याचेही उघड झाले आहे. या परदेश दौऱ्यासह इतर खर्चांसाठी फसवणुकीतील पैशांचा वापर झाला का, याचाही तपास सुरू आहे.

राज्य सायबर पोलीस डीएसपी संजीव नयन शर्मा यांनी सांगितले की, तक्रारदाराने पाठवलेली रक्कम सुमारे १५ स्तरांतून फिरवण्यात आली होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये वापरलेले २० हजारांहून अधिक बँक खाती तपास यंत्रणांनी ओळखली आहेत. तसेच, फसवणुकीतील सुमारे ३५ टक्के रक्कम दक्षिण भारतातील विविध राज्यांतील खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.  हे अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या संघटित सायबर गुन्हेगारी जाळ्याचे प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संशयित भाजपशी संबंधित असून सध्या शाजापूर जिल्हा परिषद सदस्य तसेच अखिल भारतीय बलाई समाजाचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याने या प्रकरणाची राजकीय व सामाजिक स्तरावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. तपास यंत्रणा या सायबर फसवणूक रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा