गोव्यात पाच वर्षांत किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील २८ रुग्णांचा मृत्यू

कमी मृत्यूंची नोंद असलेल्या राज्यांत गोव्याचा सातवा क्रमांक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th August, 08:44 pm
गोव्यात पाच वर्षांत किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील २८ रुग्णांचा मृत्यू

राष्ट्रीय नोंदणी पोर्टलनुसार, राज्यात मागील पाच वर्षांत किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या २८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, प्रतीक्षा यादीतील रुग्णांच्या कमी मृत्यूंची नोंद असलेल्या राज्यांच्या यादीत गोव्याचा देशात सातवा क्रमांक लागतो. २०२१ ते २०२५ या कालावधीत देशभरात किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील एकूण १,२२६ रुग्णांचा मृत्यू झाला.

गोव्यात पाच वर्षांत ३४ किडनी प्रत्यारोपण

केंद्रीय आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत गोव्यात किडनी प्रत्यारोपणाच्या एकूण ३४ शस्त्रक्रिया झाल्या. २०२१ मध्ये ८ शस्त्रक्रिया झाल्या आणि प्रतीक्षा यादीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये प्रत्यारोपणाच्या ३ शस्त्रक्रिया झाल्या, तर प्रतीक्षा यादीतील १० रुग्णांचा मृत्यू झाला.

२०२३ मध्ये गोव्यात ६, तर २०२४ मध्ये १० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, या दोन्ही वर्षांत प्रतीक्षा यादीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र, २०२५ मध्ये ७ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आणि प्रतीक्षा यादीतील सर्वाधिक १७ रुग्णांचा मृत्यू झाला.

२०२५ मध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिकगोव्यात २०२१ ते २०२५ या कालावधीत प्रतीक्षा यादीतील एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल १७ मृत्यू एकट्या २०२५ मध्ये झाले. त्याच वर्षी राज्यात किडनी प्रत्यारोपणाच्या ७ शस्त्रक्रिया झाल्या.
महाराष्ट्रात १३३ रुग्णांचा मृत्यू

केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीमध्ये २०२१ ते २०२५ या कालावधीत सर्वाधिक १०,९७३ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. या काळात प्रतीक्षा यादीतील ७३३ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात ६,२२५ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, प्रतीक्षा यादीतील १३३ रुग्णांचा मृत्यू झाला.

केरळमध्ये प्रतीक्षा यादीतील एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

केरळमध्ये या पाच वर्षांत किडनी प्रत्यारोपणाच्या ५,१३३ शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, या कालावधीत प्रतीक्षा यादीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रतीक्षा यादीतील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्याउलट ओडिशा आणि हिमाचल प्रदेशमध्ये हे प्रमाण अत्यल्प आहे.

अवयवदानासाठी ५९.७० लाखांचा निधी

केंद्र सरकारकडून राज्यांना अवयवदानाबाबत जनजागृती तसेच अन्य संबंधित उपक्रमांसाठी निधी दिला जातो. या अंतर्गत गोव्यातील ‘अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेला’ (एसओटीओ) २०२१-२२ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षांदरम्यान एकूण ५९.७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे आणि प्रत्यारोपणाशी संबंधित यंत्रणा सक्षम करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो.

हेही वाचा
सर्व पहा