डॉ. प्रेमानंद रामाणींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : प्रतिष्ठेच्या ‘गोवा भूषण’ पुरस्काराने सन्मानित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th August, 08:50 pm
डॉ. प्रेमानंद रामाणींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार!

गोव्याचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या अमूल्य वैद्यकीय योगदानाची दखल घेत, गोवा सरकारतर्फे पुढील वर्षीच्या पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. बिल्वदल परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. रामाणी यांना ‘गोवा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सत्कार समारंभाला उद्योजक अवधूत तिंबलो, किरण ठाकूर आणि सागर जावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रेमानंद रामाणी यांचे जीवनकार्य सर्वांसाठी आदर्श असून, गोवा सरकारने त्यांना यापूर्वीच ‘गोमंत विभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पद्म पुरस्कारासाठी सरकारकडून शिफारसडॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत, त्यांच्या नावाची पुढील वर्षी पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.
न्यूरो सर्जरी क्षेत्रात जागतिक दबदबा

गोव्यात जन्मलेल्या डॉ. रामाणी यांनी काही काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, लंडन आणि स्वीडन येथे पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. विदेशात काम करण्याच्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी भारतात परतून सामान्य जनतेसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विकसित केलेली ‘न्यूरो स्पायनल सर्जरी’ जगभरात प्रसिद्ध असून, या शस्त्रक्रिया पद्धतीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. न्यूरो सर्जरी क्षेत्रातील जगातील प्रसिद्ध डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश होतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

औषधी वनस्पतींच्या संवर्धनावर भर

गोव्यात आजही औषधी वनस्पतींच्या उपचारपद्धतीवर विश्वास ठेवणारे अनेक नागरिक आहेत. या पारंपरिक उपचारपद्धतीची दखल घेत राज्य सरकारने औषधी झाडांची पाने, मुळे आणि साल गोळा करणाऱ्या वैद्यांना अधिकृत ओळखपत्रे दिली आहेत. दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

‘वैद्य मित्र’साठी स्वतंत्र सोसायटीचा विचार

राज्यात वैद्य किंवा ‘वैद्य मित्र’ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र सोसायटी स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. या प्रस्तावावर सध्या प्राथमिक स्तरावर काम सुरू असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा