पेडणे: कोरगाव येथील दिव्यांग विद्यार्थी दक्ष राजेंद्र पोळजी याला आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकारातून आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते नुकतीच एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दक्ष याने स्वतःच्या स्वावलंबनासाठी व दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअरची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार आर्लेकर यांनी त्याला ही मदत उपलब्ध दिली.
यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, खासदार सदानंद शेट तानावडे आणि दक्ष पोळजी याचे कुटुंबीय उपस्थित होते. या व्हीलचेअरमुळे दक्षला आता घराबाहेर पडणे, आपले शिक्षण पूर्ण करणे आणि दैनंदिन जीवनातील हालचाली अधिक सुलभतेने तसेच आत्मविश्वासाने करणे शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल आणि तातडीने केलेल्या मदतीबद्दल दक्षच्या कुटुंबीयांनी आमदार प्रवीण आर्लेकर आणि खासदार तानावडे यांचे मनापासून आभार मानले आहेत.


