वास्को: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बंजारा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी आणि युवकांनी एकत्र येत वास्को तसेच हणजूण पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. समाजाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्याला त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांनी वास्को पोलीस ठाण्याबाहेर केली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सहा दिवसांपूर्वी बायणा येथील संतोष लामाणी याच्यावर स्वामी समर्थांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्या घटनेचा संबंध जोडत सोशल मीडियावर एका युझरने बंजारा समाजाविषयी आणि समाजातील महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील विधाने करणारा व्हिडिओ आणि कमेंट्स इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. यामुळे बंजारा समाजाची नाहक बदनामी झाली असून समाजाच्या भावना या प्रकारामुळे देशभरातील बंजारा बांधवांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ प्रथम हणजूण पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर वास्को पोलीस ठाण्यात एकत्र येत बंजारा समाजाच्या युथ विंगने पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन रीतसर तक्रार सोपवली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षकांनी संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल आणि आवश्यक ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन उपस्थित जमावाला दिले. मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतरही संबंधित व्यक्ती वेळेत हजर न झाल्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला नाही, तर वास्को पोलीस ठाण्यासमोर संपूर्ण गौर बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही समाजाच्या अस्मितेला व सामाजिक सलोख्याला धक्का पोचवणाऱ्या प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कठोर चाप लावावा, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली आहे.


