मडगाव: सासष्टी तालुक्यातील बाणावली येथे बेकायदेशीरपणे आयोजित करण्यात आलेल्या 'धीरयो'प्रकरणी कोलवा पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. नावेली येथील सिकेटी भागातील रहिवासी मॅन्यूएल वाझ आणि बाणावली येथील अस्कोना भागातील रहिवासी मिंगेल अशी गुन्हा नोंदवलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी बाणावली येथील ग्रँड पुलवाडा परिसरात या बेकायदेशीर धीरयोचे आयोजन करण्यात आले होते. या धीरयोची दृश्ये आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडिओंची कोलवा पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेतली आणि तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी दोन्ही संशयितांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश महाले या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गोव्यात उच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही बेकायदेशीरपणे धीरयोचे आयोजन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


