वाळपई : सत्तरी तालुक्यातील म्हाऊस-वाळपई मुख्य रस्त्यावर पिसो मंदिराजवळ एका गव्याने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोपार्डे येथील सुरेश कोपार्डेकर हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सत्तरीतील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कोपार्डेकर हे आपल्या स्कूटरवरून म्हाऊस–वाळपई रस्त्याने प्रवास करत होते. पिसोदेव मंदिराजवळ पोहोचताच अचानक एका गव्याने रस्त्यावर धाव घेत त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, सुरेश कोपार्डेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सत्तरी तालुक्यातील म्हाऊस, कोपार्डे, वाळपई, म्हादई अभयारण्यालगतचा परिसर आणि इतर डोंगराळ भागात रानगवे, रानडुक्कर, हरीण यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः पहाटे, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी हे प्राणी अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यात वनक्षेत्रातील हालचाली वाढल्याने हे प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात रस्त्यांच्या परिसरात येतात. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
म्हाऊस–वाळपई मार्ग आणि कोपार्डे परिसरासह सत्तरीतील अनेक ग्रामीण रस्त्यांवर वन्यप्राण्यांमुळे अपघात घडण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, या संवेदनशील मार्गांवर पुरेसे इशारा फलक, वेगमर्यादा नियंत्रण, प्रकाशयोजना आणि प्राणी रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणांची स्पष्ट चिन्हांकित व्यवस्था नाही, अशी तीव्र तक्रार स्थानिकांनी केली आहे.
वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन
वन विभाग आणि स्थानिकांनी वाहनचालकांना म्हाऊस–वाळपई मार्गासह वनक्षेत्रालगतच्या रस्त्यांवर विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे, रात्रीच्या वेळी हाय-बीमचा योग्य वापर करणे आणि रस्त्याच्या कडेला हालचाल दिसल्यास तातडीने वेग कमी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.


