काणकोणमधील खोतीगाव येथे गव्यांचा उपद्रव

स्थानिकांची चिंता वाढली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
काणकोणमधील खोतीगाव येथे गव्यांचा उपद्रव

पैंगीण : काणकोण तालुक्यातील खोतीगाव परिसरात गव्यांचा उपद्रव वाढला आहे. शेजारच्या वनक्षेत्रातून गवे नागरी वस्तीत, रस्त्यांवर तसेच शेतीत येत आहेत. गवे शेतीची हानी करण्याबरोबरच रस्त्यांवरही ठाण मांडून राहत असल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. पिकांचे नुकसान करण्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीला धोका निर्माण करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने गवे मानवी वस्तीत येत असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. काल रविवारी खोतीगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पणसुलेमळ, तामणमळ भागात एक गवा स्कूटरस्वाराला आडवा आला. अचानक पुढे आलेल्या गव्यामुळे स्कूटर चालक महिला आणि तिच्यासोबत असलेल्या महिलेने स्कूटर रस्त्यावर टाकून पळ काढला. सूर्यास्ताची वेळ आणि निर्जन, चिखलमय रस्ता असल्याने, त्यांनी एका झाडामागे आश्रय घेतला. दोन्ही महिलांनी आपल्या मोबाईलवर त्या गव्याची छायाचित्रे काढली.

सुदैवाने गव्याने त्यांना काही इजा केली नसली तरी, या रस्त्याने अनेक लहान मुले, शालेय विद्यार्थी ये-जा करत असल्याने धोका संभवत असल्याचे त्यांनी सांगितले. भीतीने गाळण उढालेल्या या दोन्ही महिलांनी आपल्यावरील आपभीती इतर स्थानिकांना सांगितली. स्थानिकांनी त्यांना धीर दिला. अशा निर्जन रस्त्यांवर सुरक्षेसाठी वनरक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली.

वनक्षेत्रात जन्मलेलो असल्याने स्वत:ला वन्यप्राण्यांची फारशी भीती वाटत नसली तरी, या रस्त्यांनी जात असलेली लहान मुले, शालेय विद्यार्थी यांची चिंता वाटत असल्याचे सांगितले. वन खात्याने नागरी वस्तीत फिरत असलेल्या गव्यांचा बंदोबस्त करावा व सुरक्षेसाठी वन रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा