पणजी: येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्यातील नगर नियोजन, वाढती बेरोजगारी आणि एका खाजगी प्रकल्पावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. कारापूर-सर्वण येथील मेगा प्रकल्पाला स्थानिक जनतेकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या कंपनीकडून पत्र पाठवून कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे संपूर्ण षड्यंत्र मुख्यमंत्री आणि नगर नियोजन मंत्र्यांच्या दबावाखाली रचले जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सरचितणीस विजय भिके यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या १४४ दिवसांपासून कारापूर येथील बहुजन समाजाचे नागरिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि जमिनीच्या रक्षणासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे, तर काणकोण येथे झालेल्या बैठकीत या लढ्याला पूर्ण पाठिंबा देणारा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. एवढे दिवस उलटूनही मुख्यमंत्री आणि नगर नियोजन मंत्र्यांकडून आंदोलकांशी कोणताही सकारात्मक संवाद साधला गेलेला नाही, जे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाबाबत जाहीर प्रश्न उपस्थित केले असता कंपनीकडून आपल्याला पत्र पाठवून मौन बाळगण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, मोपा आणि बेळगाव विमानतळावर उभ्या असलेल्या सुमारे १३० कोटी रुपयांच्या प्रायव्हेट जेटवरूनही चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केले. गोव्यातील पारंपरिक आणि नामांकित उद्योगपतींपैकी कोणाकडेही स्वतःचे प्रायव्हेट जेट नसताना, हे १३० कोटींचे जेट नेमके कोणाच्या मालकीचे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यातून प्रवास केला आहे का, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, रातोरात करोडपती होण्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांना दिला असून, तो राज्यातील बेरोजगार तरुणांना आणि नोकरीच्या आशेने आंदोलने करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनाही द्यावा, असा खोचक टोला त्यांनी लगावला.


