मंदार सुर्लकर खूनप्रकरण: आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

आरोपी पिंटोची कोलवाळ तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
33 mins ago
मंदार सुर्लकर खूनप्रकरण: आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

पणजी: वास्को येथील बहुचर्चित मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या गोवाास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायदेशीर घडामोडी सुरू असतानाच, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील एक आरोपी जोविता रायन पिंटो याला सोमवारी सायंकाळी कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.

वास्को येथील मंदार सुर्लकर याचे १४ ऑगस्ट २००६ रोजी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोविता रायन पिंटो आणि अल सलेटा बेग यांनी एकत्र येऊन या अपहरणाचा कट रचला होता. अपहरण केल्यानंतर आरोपींनी मंदारची निर्घृण हत्या केली आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह फोंडा येथील आर्ला-केरी भागातील निर्जन ठिकाणी फेकून दिला होता. मृतदेह हाती लागल्यानंतर तत्कालीन पणजी पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सर्व संशयितांना तात्काळ अटक केली होती.

दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर २३ जून २०१४ रोजी बाल न्यायालयाने रोहन पै धुंगट, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि जोविता रायन पिंटो या चारही आरोपींना मंदारच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, या प्रकरणात राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने २१ मे २०२५ रोजी आरोपींना मुदतीपूर्वी सोडण्याची शिफारस केली होती. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या शिफारशीला नकार देत आरोपींना मुक्त करण्यास स्पष्ट असहमती दर्शवली होती. सरकारच्या या नकाराला रोहन पै धुंगट, शंकर तिवारी आणि जोविता रायन पिंटो यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, तर दुसरीकडे मंडळाच्या सुटकेच्या शिफारशीविरोधात मंदारच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत आरोपींची मुदतीपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

दरम्यान, जोविता रायन पिंटो अजूनही तुरुंगातच असल्याची माहिती सोमवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला तांत्रिक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून सोमवारी सायंकाळपर्यंत पिंटोला सोडण्याचे निर्देश दिले. तसेच परोलवर बाहेर असलेल्या रोहन पै धुंगट व शंकर तिवारी यांना मंगळवारी तुरुंगात हजर राहून सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा सर्व आरोपींवर पूर्णपणे बंधनकारक राहील, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा
सर्व पहा