रांची : झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. विधानसभा परिसराकडे कूच करणाऱ्या आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज केला.
झारखंड लोकशाही क्रांतिकारी मोर्चाचे (JLKM) नेते देवेंद्रनाथ महतो यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नोकरी इच्छुकांनी विधानसभेकडे मोर्चा काढला. महतो हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असून, उपोषणामुळे त्यांचे सुमारे १०.५ किलो वजन कमी झाले आहे. प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हातात माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे छायाचित्रही होते.
दरम्यान, भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांप्रकरणी झारखंड सीआयडीने माजी जेपीएससी (JPSC) अध्यक्षाला अटक केली आहे. २८ जुलैपासून त्यांची चार वेळा चौकशी करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने रविवारी, ९ ऑगस्ट रोजी सुमारे सहा तासांच्या चर्चेनंतर १४वी जेपीएससी (JPSC) प्राथमिक परीक्षा तसेच २०२३ आणि २०२५ मधील जेपीएससी बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली. जेपीएससीच्या तिन्ही सदस्यांनीही राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांना “पूर्ण पारदर्शकतेने न्याय दिला जाईल” अशी ग्वाही दिली.
मात्र, सरकारच्या या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबलेले नाही. जेएसएससी-सीजीएल परीक्षेतील कथित अनियमिततेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी कायम ठेवली आहे. जेएलकेएम आणि जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्मस मंच ( JPSC-JSSC Reforms Manch) यांनी जेएसएससी-सीजीएल परीक्षा तसेच टीसीआर डेटा प्रोसेसींग प्रायव्हेट लिमिटेड या काळ्या यादीतील संस्थेशी संबंधित सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.


