नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशि थरूर यांच्या एका वक्तव्यामुळे पक्षांतर्गत वर्तुळात पुन्हा एकदा नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाची तुलना जंतर-मंतरवरील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाशी करताना थरूर यांनी, काँग्रेस पक्षाला तरुणांशी आणि विशेषतः 'जेन झी' (Gen Z) पिढीशी हवा तसा राजकीय संवाद साधता आलेला नाही, असे मत मांडले होते. थरूर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रतिक्रिया दिली असून सार्वजनिक ठिकाणी विधान करताना पक्षातील सर्व नेत्यांनी संयम आणि दक्षता बाळगावी, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.
के. सी. वेणुगोपाल यांनी थरूर यांच्यावर थेट हल्ला चढवणे टाळले असले तरी, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाला काँग्रेसवर किंवा राहुल गांधींवर टीका करण्याची आयती संधी मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व नेत्यांनी पक्षाची विचारधारा आणि शिस्तीच्या चौकटीत राहूनच विधाने केली पाहिजेत. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधींवर किंवा पक्षाच्या धोरणांवर नकारात्मक टिप्पणी केल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला. मात्र, शशि थरूर यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले असावे असे आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या उपक्रमाचा बचाव करताना सांगितले की, प्रयागराज येथील कार्यक्रमात तरुणांची आणि 'जेन झी'ची उपस्थिती मोठी होती आणि उत्तर प्रदेश सरकारने हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत असून, पोलीस कारवाईला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत.
दुसरीकडे, आपल्या विधानावरून वाढता वाद पाहता शशि थरूर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपला उद्देश काँग्रेस पक्षावर किंवा पक्षाच्या नेतृत्वावर टीका करण्याचा अजिबात नव्हता, तर माध्यमांच्या एका घटकाने आपल्या वक्तव्याचा मूळ संदर्भ बदलून तो मांडला, असा दावा त्यांनी केला. प्रस्थापित राजकीय पक्षांनी नवीन पिढीसाठी आपली दारे अधिक खुली केली पाहिजेत आणि तरुणांना केवळ निवडणुकीपुरते वापरून न घेता पक्षात सक्रिय नेतृत्व व स्थान दिले पाहिजे, हाच आपल्या सांगण्याचा मुख्य उद्देश होता, असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले आहे.


