नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या २० टक्के इथेनॉल मिश्रण (E-20) धोरणावरून सध्या देशभरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर जोरदार चर्चा रंगली आहे. या धोरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी केलेले एक आक्रमक आणि वादग्रस्त विधान समोर आले आहे. इथेनॉल मिश्रणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि 'शुद्ध पेट्रोल'ची मागणी करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करताना, "शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार?" असा सवाल मिश्रा यांनी विचारला. त्यांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वातावरणात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
देशातील इंधन परिस्थितीचे वास्तव आणि आर्थिक बाजू मांडताना खासदार मिश्रा यांनी सांगितले की, भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी केवळ २० टक्के उत्पादन देशांतर्गत होते, तर उर्वरित ८० टक्के तेल परदेशातून आयात करावे लागते. सध्याच्या जागतिक राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय तणाव आणि सागरी वाहतुकीतील अडचणींमुळे तेलवाहू जहाजांना भारतापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे अब्जावधी रुपयांचे परकीय चलन वाचवण्यासाठी आणि इंधन क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना खासदारांनी ब्राझीलचे उदाहरण दिले. ब्राझीलमध्ये सध्या १०० टक्के इथेनॉलवर वाहने यशस्वीपणे धावत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय तज्ज्ञांच्या तांत्रिक तपासणीनुसार इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही; मात्र तरीही काही घटकांकडून यासंदर्भात अनावश्यक भ्रम आणि भीती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, केंद्र सरकारनेही ई-२० इंधनामुळे वाहनांचे इंजिन खराब होणे किंवा गंज लागणे याबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्याचा विचार करता बायो-गॅस आणि सीएनजीसारख्या पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत मिश्रा यांनी सरकारच्या धोरणाचा पुनरुच्चार केला.


