माणगाव (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले असून, यामागे राजकीय हस्तक्षेप आणि ‘टक्केवारीच्या राजकारणा’चा प्रभाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. विकासकामांपेक्षा टक्केवारीचा विचार अधिक केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
रायगड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या हस्ते माणगाव येथे मनसेच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील विविध प्रश्नांवर भाष्य केले.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘कंत्राटदार कंटाळून निघून गेल्याने काम रखडले,’’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, कंत्राटदाराने काम सोडण्याची वेळ का आली, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. गेल्या १५ वर्षांपासून महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. आगामी सणासुदीच्या काळात पुन्हा प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.
‘तिसऱ्या मुंबई’बाबत स्थानिकांच्या हिताचा सवाल
कोकणात प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ आणि विकास प्रकल्पांबाबतही ठाकरे यांनी स्थानिकांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी, पाणी आणि विजेचा वापर होत असेल, तर त्याचा स्थानिकांना नेमका किती फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला.
‘‘परप्रांतीय तरुणांना महाराष्ट्रात काय होणार आहे, याची आधीच माहिती मिळते. ते त्यानुसार तयारी करून येथे येतात. मात्र, स्थानिक तरुणांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही. आमच्या जमिनी, पाणी आणि विजेवर बाहेरचे लोक पोसले जाणार असतील, तर अशा विकासाचा उपयोग काय?’’ असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
पालकमंत्रिपदाच्या वादावरही भाष्य
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ठाकरे यांनी हा मुद्दा जनतेच्या हितापेक्षा क्षुल्लक असल्याचे म्हटले. ‘‘लोकांच्या हितापुढे पालकमंत्रिपदाचा वाद क्षुल्लक आहे. सरकारने स्वतःच्या लोकांचे हित जपले पाहिजे. पायाखालची जमीन हेच तुमचे अस्तित्व आहे. ती विकली, तर तुमचे अस्तित्व संपेल,’’ असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.


