सुपर टायफून ‘डॉल्फिन’चा आशियात कहर;गोव्यासहीत भारताच्या मान्सूनवरही परिणाम

२१६ किमी प्रतितास वेगाने वारे, १५०० उड्डाणे रद्द १० लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
सुपर टायफून ‘डॉल्फिन’चा आशियात कहर;गोव्यासहीत भारताच्या मान्सूनवरही परिणाम

 नवी दिल्ली : पश्चिम प्रशांत महासागरातून निर्माण झालेल्या ‘डॉल्फिन’ या शक्तिशाली टायफूनने पूर्व आशियात मोठा कहर केला आहे. ताशी तब्बल २१६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह या वादळाने जपाननंतर चीनच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा दिला. वादळाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. १,५०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव १० लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोव्यासहीत भारताच्या मान्सूनवरही परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

चीनमध्ये समुद्राला उधाण; अनेक भागांत मुसळधार पाऊस

चीनच्या झेजियांग आणि फुजियान प्रांतांच्या किनारी भागांना टायफूनचा मोठा फटका बसला आहे. समुद्रात प्रचंड उंच लाटा उसळत असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. शांघाय, निंगबो यांसह प्रमुख शहरांमधील विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक बंदरे बंद करण्यात आली असून, हजारो बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.

जपानमध्ये वीजपुरवठा आणि वाहतूक विस्कळीत

जपानच्या ओकिनावा आणि कागोशिमा परिसरातही वादळाचा प्रभाव जाणवत आहे. मोठ्या संख्येने घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.  स्थानिक वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला आहे. बंदरांवरील कामकाज थांबवण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या मान्सूनवरही अप्रत्यक्ष परिणाम

‘डॉल्फिन’चा मार्ग थेट भारताच्या दिशेने नसला, तरी या शक्तिशाली हवामान प्रणालीचा भारतीय मान्सूनवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशक्तिशाली वादळामुळे समुद्रातील उष्णता आणि बाष्प मोठ्या प्रमाणात खेचले जाते. परिणामी बंगालच्या उपसागरातून भारताकडे येणाऱ्या मान्सूनी वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, मध्य भारत, उत्तर भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनची गती काही काळ मंदावू शकते. त्यामुळे काही दिवस पावसाचा ‘ब्रेक’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गोवा, दक्षिण भारताकडेही परिणामाची नजर

सध्या मान्सूनसाठी आवश्यक असलेले काही वारे त्यांच्या नेहमीच्या दिशेने भारताकडे येण्याऐवजी पूर्वेकडील शक्तिशाली हवामान प्रणालीकडे खेचले जात असल्याचे सांगितले जात आहे. सोमाली जेट प्रवाह, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि तैवानजवळील हवामान प्रणाली यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या हालचालींमध्ये बदल झाला आहे. सोमालीया जेट स्ट्रिममुळे गोवा आणि दक्षिणेकडेकडून वारा पुढे सरकत आहे. 

१५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा नाही

महाराष्ट्रात सध्या मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असून, १५ ऑगस्टपर्यंत राज्यात अतिमुसळधार पावसाचा कोणताही मोठा इशारा नसल्याचे सांगितले जात आहे. काही भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या भागांत कमी दाबाचे पट्टे सक्रिय होतील, तिथे मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘डॉल्फिन’चा मान्सूनवरील प्रभाव कायमस्वरूपी नसून तात्पुरता असण्याची शक्यता आहे. वादळ जमिनीवर आल्यानंतर कमजोर होत जाईल आणि त्यानंतर मान्सूनची स्थिती पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा
सर्व पहा