‘जानेवारीपर्यंत संपूर्ण गोव्यात वाहतुकीवर राहणार एआय कॅमेऱ्यांची नजर’

रस्ता सुरक्षेला प्राधान्य; वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
‘जानेवारीपर्यंत संपूर्ण गोव्यात वाहतुकीवर राहणार एआय कॅमेऱ्यांची नजर’

पणजी : येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण गोव्यात वाहतुकीवर एआय (AI)  आधारित कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दंड वसूल करणे हा सरकारचा उद्देश नाही. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लावणे याला प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पहिल्या टप्प्यात २९ ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  आता आणखी २९ ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होणार आहे. सध्या या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दररोज हजारो नव्हे, तर शेकडो वाहतूक उल्लंघनांची चलन जारी होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

नियमांचे पालन वाढल्याचे चित्र पीयूसी केंद्रांवरील वाढलेल्या गर्दीतूनही दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर वाहनांचा विमा काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. वाहन चालविताना अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यास वाहनचालकावर वैयक्तिक जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वाहनाचा विमा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन 

दरम्यान, रेंट-अ-कॅब सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक सिग्नल व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस, आरटीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहील, यासाठी ही समिती काम करणार असल्याचेही गुदिन्हो यांनी सांगितले.


हेही वाचा
सर्व पहा