बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी सकाळी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले. या भूकंपात आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला असून ५७० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Death toll rises to 132 with hundreds more injured in Colombia earthquake, association says)
कोलंबियन असोसिएशन ऑफ कॅपिटल सिटीजच्या माहितीनुसार, पाच राजधानी शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे देशभरात ८६ इमारती कोसळल्या, तर सात विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. काली शहरात तब्बल १८८ जण बेपत्ता असल्याची माहिती महापौरांनी दिली.
रुग्णालयाचा बाल विभागही कोसळला
भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काली शहरातील एका रुग्णालयातील बालरुग्ण आणि नवजात शिशू विभागाचे बांधकाम कोसळल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. परेरा शहरात केबल कारमध्ये अडकलेल्या १६ जणांची सुमारे सहा तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.
बोगोटामध्येही भूकंपाचे तीव्र धक्के
भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम कोलंबियातील सॅन होसे डेल पालमार येथे होता. हा परिसर बोगोटापासून सुमारे १५० मैल पश्चिमेला आहे. राजधानी बोगोटामध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नागरिकांनी खबरदारी म्हणून घरे, कार्यालये आणि शाळांमधून बाहेर पडत रस्त्यांवर धाव घेतली.
सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती घोषित
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोलंबिया सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. प्रभावित भागात सैनिक तैनात केले आहेत. ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध, जखमींना वैद्यकीय मदत आणि बाधितांसाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, अमेरिकेने कोलंबियाला १५.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. निवारा, अन्न, संरक्षण आणि भूकंपामुळे झालेल्या नुकसानीच्या आकलनासाठी ही मदत वापरली जाणार आहे. अमेरिकन दूतावासाने कोलंबियातील अमेरिकन पर्यटकांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
‘कॉफी अॅक्सिस’ला मोठा फटका
भूकंपाचा तडाखा कोलंबियाच्या प्रसिद्ध ‘कॉफी अॅक्सिस’ प्रदेशाला बसला आहे. डोंगराळ आणि हिरवाईने नटलेल्या या प्रदेशाचे कोलंबियाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. याच भागात १९९९ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात सुमारे १,२०० जणांचा मृत्यू झाला होता. दशकभरातील देशातील सर्वात शक्तिशाली भूकंप म्हणून या भूकंपाकडे पाहिले जात आहे. बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे.


