पणजी : मतभेद दूर ठेवून व सर्व प्रकारचा त्रास सहन करून काँग्रेस पक्ष भाजप विरोधी पक्षांच्या युतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. यासाठी पक्षाने समिती स्थापन केली असून चर्चेला सुरवात झाल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी प्रथमच काँग्रेसने युतीची बोलणी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीची पहिली बैठक मडगावात झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली.
राज्यात भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन समिती स्थापन केली आहे. इतर कोणत्याही पक्षाने युतीसाठी समिती स्थापन केलेली नाही. जे पक्ष निवडणुकीत भाजपला हरवू पहात आहेत, त्या सर्वांशी बोलणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. काँग्रेस प्रमाणेच इतर विरोधी पक्ष सुद्धा सर्व ४० मतदारसंघांत कार्य करीत आहेत.
काही पक्षांकडून काँग्रेसवर आरोपही झाले आहेत. विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. तरीही भाजपला हरविण्यासाठी मतभेद बाजूला ठेवले जातील. युतीसाठी काँग्रेसला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला तरी तो सहन करण्याची तयारी आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीची बोलणी तूर्त थांबवली आहेत. गोवा फॉरवर्ड काँग्रेस प्रमाणे सर्व मतदारसंघांत कार्य करीत आहे. बोलणी थांबवली असली तरी योग्य वेळ येताच निर्णय घेतला जाईल. टाळी एका हाताने वाजत नसते. युतीसाठी इतर पक्षांकडूनही सकारात्मक प्रतिसाद येण्याची आवश्यकता आहे. युतीसाठी सर्व पक्षांबरोबर बोलणी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला, असे गिरीश चोडणकर म्हणाले.
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने युतीसाठी समिती स्थापन केली आहे. विधीमंडळ नेते युरी आलेमाव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख हे बैठकीला उपस्थित होते.


