वाळपई : सावर्डे येथील तोणीर-काजरेधाट धबधबा परिसरात विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. या मृत्यूच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी उत्तर विभागाचे उपवनसंरक्षक यांना २४ तासांत सविस्तर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तोणीर-काजरेधाट धबधबा परिसरातील दुर्घटनेचा तपशील देत वन खात्याने सुरक्षा आदेशांचे पालन केले की नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर मागितले आहे. प्राप्त अहवालानुसार, संबंधित धबधबा म्हादई वन्यजीव अभयारण्य, अंतर्गत वन खात्याच्या अधिकारक्षेत्रात येतो. या परिसरात ग्रामपंचायतीने इशारा फलक लावले होते; मात्र दुर्घटनास्थळी बॅरिकेडिंग नव्हते. वन विभागाचे कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक तैनात नव्हते, प्रत्यक्ष धोकादायक ठिकाणी इशारा फलक आढळून आला नाही, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांमध्ये गंभीर हलगर्जीपणा झाला का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वन खात्याला खालील मुद्द्यांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात दुर्घटनेपूर्वी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी का तैनात नव्हते? २९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या सुरक्षा आदेशांच्या पालनासाठी विभागाने कोणती कार्यवाही केली? इशारा फलक, बॅरिकेडिंग, कर्मचारी तैनाती, सार्वजनिक प्रवेश नियंत्रण आणि पर्यटकांवर देखरेख यासाठी कोणते उपाय करण्यात आले? इशारा फलक हटविण्यात आल्याची माहिती खात्याला होती का? असल्यास त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली? नियमित गस्त, तपासणी किंवा देखरेख केली जात होती का? त्यासंबंधी नोंदी उपलब्ध आहेत का? सुरक्षा त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे का?
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाय प्रस्तावित आहेत?
छायाचित्रांसह सर्व कागदपत्रे जोडण्याचे आदेश
वन खात्याने अहवालासोबत छायाचित्रे, कर्मचारी तैनातीचा तपशील, तपासणी अहवाल, गस्त नोंदी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या अंमलबजावणीसंबंधी सर्व संबंधित कागदपत्रे जोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर तातडीने ठेवण्यासाठी २४ तासांच्या आत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.


