‘दीप विहार’च्या चार शिक्षक, दोन टूर ऑपरेटरना सशर्त जामीन

वाळपई न्यायालयाचा आदेश : राहुल बिंद याच्या मृत्यूप्रकरणी होते अटकेत

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
09th August, 11:35 pm
‘दीप विहार’च्या चार शिक्षक, दोन टूर ऑपरेटरना सशर्त जामीन

वाळपई : सत्तरी तालुक्यातील तोणीर-काजरेधाट धबधब्यावर बुडून १७ वर्षीय विद्यार्थी राहुल बिंद याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ‘दीप विहार’ हायर सेकंडरी स्कूलच्या चार शिक्षकांसह दोन टूर ऑपरेटरना वाळपई प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
७ ऑगस्ट रोजी दीपविहार हायर सेकंडरी स्कूलचे २३ विद्यार्थी, चार शिक्षक व दोन टूर ऑपरेटर ट्रेकिंगसाठी धबधब्यावर गेले होते. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना राहुल बिंद पाण्यात उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. धबधबा वन विभागाने पर्यटकांसाठी बंद केला असतानाही प्रवेश केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी वाळपई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संबंधितांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला. प्राथमिक चौकशी, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाची पाहणी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी निधी शिर्लेकर, विद्या गावडे, ब्लांश फर्नांडिस आणि यशवंत कंकणावर या चार शिक्षकांसह आदित्य दळवी आणि मंजुनाथ यांम्मियार या दोन टूर ऑपरेटरना अटक केली होती.
डिचोलीच्या पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपईचे पोलीस निरीक्षक विदेश बेळगावकर पुढील तपास करीत आहेत.
तपासात सहकार्य करण्याचे निर्देश
अटक केलेल्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करणे, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे आणि आवश्यकतेनुसार वाळपई पोलीस स्थानकात हजेरी लावणे, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
धबधब्यावर जाणे टाळा!
वन विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की तोणीर-काजरेधाट धबधबा पर्यटकांसाठी बंद असून, त्या परिसरात प्रवेश करणे कायद्याच्या विरोधात आहे. विशेषतः पावसाळ्यात तेथील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.                               

हेही वाचा
सर्व पहा