दाबोळीत महामार्गालगतचे होर्डिंग दुचाकीवर कोसळले

हेल्मेटमुळे बचावला दुचाकीस्वार : महामार्गालगतची होर्डिंग हटविण्याची मागणी

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
18th August, 11:49 pm
दाबोळीत महामार्गालगतचे होर्डिंग दुचाकीवर कोसळले

जाहिरात फलकाचा रस्त्यावर कोसळलेला मोठा भाग.

वास्को : दाबोळी विमानतळासमोरील चौपदरी महामार्गालगत उभारलेल्या एका भल्या मोठ्या जाहिरात फलकाचा काही भाग मंगळवारी अचानक खाली कोसळून तेथून जाणाऱ्या दुचाकीवर पडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार ओंकार सावंत हा युवक थोडक्यात बचावला. त्याने हेल्मेट घातलेले असल्याने मोठी दुर्घटना टळली असून, त्याच्या हातापायाला व खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तर त्याच्या दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले.
ओंकार सावंत दुचाकीने महामार्गावरून जात असताना संबंधित फलकाचा काही भाग हलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र, तो पुढे जाण्यापूर्वीच फलकाचा शेवटचा भाग खाली कोसळून दुचाकीच्या हँडलला धडकला. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत वाहन पुढे नेल्याने तोही बचावला.फलकाचा मोठा भाग रस्त्यावर पडल्याने शांतीनगर-दाबोळी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने फलकाचे अवशेष हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. फलकाचा एक तुकडा इतका जड होता की तो उचलण्यासाठी अनेक जणांची मदत घ्यावी लागली.

दरम्यान, महामार्गालगत असलेल्या सर्व मोठ्या जाहिरात फलकांची तातडीने तपासणी करून धोकादायक फलक हटवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

पूर्वीच देण्यात आला होता इशारा
सामाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी काही दिवसांपूर्वी याच फलकावरील पत्रा सैल होऊन लोंबकळत असल्याबाबत संबंधितांचे लक्ष वेधले होते. मात्र, योग्य ती खबरदारी न घेतल्याने अखेर फलकाचा मोठा भाग कोसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अशा धोकादायक जाहिरात फलकांची तातडीने तपासणी करून ते हटवावेत, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पोळजी यांनी केली आहे.      

हेही वाचा
सर्व पहा