म्हापसा : पर्वरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भाग्यविधाते स्व. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाऊप्रेमींनी पर्वरी उड्डाणपूल नामकरण समितीच्या झेंड्याखाली केली आहे.
मंगळवारी, म्हापसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत या समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, संजय बर्डे, मीलन वायंगणकर, दीपेश नाईक, भाई मोये, रामदास मोरजे, अमृत आगरवाडेकर, अशोक परवार व उदय म्हालदार हे उपस्थित होते. यासंदर्भात पंतप्रधानांना मागणीचे निवेदन सादर केले जाणार आहे, असे समितीने यावेळी सांगितले.
मगोचे ज्येष्ठ नेते भाई मोये म्हणाले की, गोव्याच्या मुक्तीनंतर राज्याची स्वतंत्र ओळख, अस्मिता आणि बहुजन समाजाचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्यात भाऊसाहेबांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी संपूर्ण राज्यात शाळा, रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण केले. गोव्याच्या अस्मितेचा योग्य सन्मान राहावा, यासाठी पर्वरी उड्डाणपुलाला त्यांचेच नाव मिळणे आवश्यक आहे.
संजय बर्डे म्हणाले की, स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांनी जनतेच्या भावनेचा आदर करत भाऊंच्या नामकरणासाठी सरकारकडे पुढाकार घ्यावा आणि ठाम आग्रह धरावा, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशनावेळी नामकरणावर निर्णय व्हावा!
समितीचे निमंत्रक सुभाष केरकर म्हणाले की, सरकारने मोपा विमानतळाच्या नामकरणावेळी झालेल्या वादाची पुनरावृत्ती टाळावी. या विषयावर मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले जाणार आहे. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनावेळी नामकरणावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.


